सोलापूरच्या नवगिरेनं युपी वॉरियर्सला दाखवला विजयाचा 'किरण'; मुंबईचा हंगामातील पहिलाच पराभव

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 7:41 AM IST

सोलापूरच्या नवगिरेनं युपी वॉरियर्सला दाखवला विजयाचा 'किरण'; मुंबईचा हंगामातील पहिलाच पराभव

WPL MIW vs UPW : यंदाच्या महिला आयपीएलमधील सहावा सामना मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स दरम्यान बंगळूरुत झाला. या सामन्यात सोलापूरच्या किरण नवगिरेच्या आक्रमक खेळीमुळं मुंबईचा यंदाच्या हंगामात पहिलाच पराभव झाला.

बंगळूरु WPL MIW vs UPW : यंदाच्या महिला आयपीएलमधील सहावा सामना मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स या संघात बंगळूरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात युपी वॉरियर्सनं गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सनं दारुण पराभव केलाय. विशेष म्हणजे सोलापूरच्या किरण नवगिरेनं युपी वॉरियर्सकडून खेळताना केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळं मुंबईचा पराभव झाला. युपी वॉरियर्सचा या हंगामातील पहिलाच विजय आहे. किरणनं 31 चेंडूत 57 धावांची दमदार खेळी केली. तिच्या या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. तिनं या खेळी दरम्यान चौकार आणि षटकारांच्या मदतीनं अवघ्या 10 चेंडूत 48 धावा कुटल्या. यंदाच्या हंगामात यूपीला दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र किरणच्या खेळीमुळं मुंबईविरुद्ध युपीनं विजयाचं खातं उघडलंय.

किरण नवगिरेची चौफेर फटकेबाजी : युपी वॉरियर्सकडून सलामीला येत सोलापूरच्या किरणनं मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. तिनं मुंबईच्या गोलंदाजांना धू धू धूतलं. यासह आयपीएलमध्ये तिनं पहिलं अर्धशतकही केलं. किरण नवगिरेनं 31 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी करत 57 धावांची खेळी केली. कर्णधार एलिसा हिली हिच्यासोबत तिनं पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. विशेष म्हणजे किरणनं 57 धावांपैकी 48 धावा या चौकार आणि षटकारांच्या जोरावर केल्या.

यूपीनं अवघ्या 16.3 षटकांत गाठलं लक्ष्य : यूपीची कर्णधार ॲलिसा हेलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबईनं निर्धारित 20 षटकांत 6 बाद 161 धावा केल्या. यूपी संघानं हे लक्ष्य गाठताना अवघ्या 16.3 षटकांत 163 धावा करत सामना जिंकला. यूपीचा पुढील सामना 1 मार्चला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. तर मुंबई 2 मार्चला बँगलोरविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

मुंबईचा हंगामातील पहिलाच पराभव : गतविजेत्या मुंबईला या हंगामात पहिल्याच पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबईनं यापूर्वी दिल्ली आणि गुजरात जायंट्सचा पराभव केला होता. स्पर्धेच्या इतिहासातील यूपी आणि मुंबईमधील हा चौथा सामना होता. यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत. मागील वर्षीच्या हंगामात मुंबई आणि यूपीनं प्रत्येकी एक सामना जिंकला होता. त्यानंतर एलिमिनेटरमध्ये मुंबईनं यूपीचा पराभव केला होता.

हेही वाचा :

  1. बीसीसीआयकडून खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर, श्रेयस अय्यरसह इशान किशनची काढली विकेट
  2. देशातील पहिल्या महिला पिच क्युरेटर कोण आहेत? जय शाह यांनीदेखील केलं कौतुक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.