ETV Bharat / politics

काकांविरोधात बंड करणाऱ्या अजित पवारांच्या सख्ख्या पुतण्याची 'आजोबां'ना साथ, राजकारणात होणार सक्रिय?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 11:25 AM IST

Yuugendra Pawar : आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता शरद पवारांचा आणखी एक नातू त्यांना साथ देण्यासाठी सक्रिय होताना दिसतंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे आज बारामतीतील पक्ष कार्यालयात येऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.

युगेंद्र पवार
युगेंद्र पवार

पुणे Yuugendra Pawar : महाराष्ट्राचं राजकारण ज्या घराण्याभोवती फिरते ते म्हणजे बारामतीतलं पवार घराणं. गेली 50 वर्ष बारामतीतल्या पवार घराण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राची दिशा आणि राजकारण याचं केंद्रबिंदू राहण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीय. परंतु भाजपानं अजित पवार यांना सत्तेत सोबत घेत शरद पवारांच्या घरात फूट पाडली. यानंतर पवारांच्या घरात सुद्धा दोन वेगवेगळे गट झालेले दिसत आहे. मात्र पवार घराण्यानं शरद पवारांना साथ द्यायचं ठरवल्याचं दिसून येतंय.

पक्ष कार्यालयात युगेंद्र पवार घेणार गाठीभेटी : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकाकी पडल्याचं चित्र जरी दिसत असलं, तरी पवार घराण्यातले सगळे सदस्य, आज शरद पवारांच्या पाठीशी असल्याचं मध्यंतरी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता शरद पवारांचा आणखी एक नातू युगेंद्र पवार आज बारामतीत शरद पवार यांच्यासाठी पक्ष कार्यालयात येऊन गाठीभेटी घेणार आहेत. त्यामुळं आजोबांना साथ देण्यासाठी पवार घराण्यातील आणखी एक नातू समोर आलाय. या अगोदर रोहित पवार हे राजकारणात आले आणि त्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र पार्थ पवार यांचा मावळमधून पराभव झाल्यानं कुटुंबामध्ये वाद निर्माण झाल्याचं बोललं जातं. त्याचाच परिणाम की काय पवार घराण्यात फूट पडली. त्यातच आता अजित पवार यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांनी शरद पवारांना साथ देत आत्या सुप्रिया सुळेंना सुद्धा निवडून आणण्याचं ठरवल्याचं चित्र आहे.

कोण आहेत युगेंद्र पवार? : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू असणारे युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे बंघू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. शरद पवारांना पाठिंबा देणारे युगेंद्र पवार हे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही आहेत. बारामतीतील शरयू अ‍ॅग्रोचे ते अध्यक्ष आहेत. तसंच विद्या प्रतिष्ठानमध्येही ते विश्वस्त आहेत. फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखान्याचं कामकाज युगेंद्र पवार पाहतात.

आणखी एक नातू सक्रीय : खासदार शरद पवार स्वतः बारामती मतदारसंघातील विधानसभा बैठका घेत असताना आज बारामतीमध्येच युगेंद्र पवार हेही पक्ष कार्यालयात येऊन शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी काम करणार आहेत. या आशयाचे पोस्टर्स सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यावरुन आता युगेंद्र पवारही सक्रीय राजकारणात उतरून युवकांची फळी उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी अगोदरच रोहित पवार महाराष्ट्रभर फिरत आहेत. आता त्यांच्या सोबतीला युगेंद्र पवार सुद्धा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार करणार आहेत. त्यामुळं पवार कुटुंबातला आणखी एक नातू सक्रिय राजकारणात येत असताना शरद पवारांना साथ देणार असल्याचं दिसतंय.

अजित पवारांना घरातूनच मोठं आव्हान : यापूर्वी पवार घराण्यातले रोहित पवार, पार्थ पवार यांनी निवडणुका लढवल्या आहेत. त्यात पार्थ पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर आता स्वतः युगेंद्र पवार सक्रिय होत आहेत. युगेंद्र पवार हे कुस्ती संघाचे बारामतीचे अध्यक्ष आहेत. तसंच ते उत्तम संघटक आहेत. शरद पवार यांच्यासोबत ते सातत्यानं दिसत असतात. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतरही ते शरद पवारांसोबत अनेक वेळा फिरताना पाहायला मिळाले. बारामती शहरात उत्तम संघटक म्हणून ते काम करत आहेत. त्यामुळंच आज ते पक्ष कार्यालयात येत आहेत. त्यामुळं पवारांचा आणखी एक नातू पवारांचे दंड बळकट करण्यासाठी आणि अजित पवारांना रोखण्यासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. यामुळं एक प्रकारे अजित पवारांना घरातूनचं मोठं आव्हान आहे. सुनेत्रा पवार यांना उभे करण्यासाठी अजित पवारांना आता आणखी जास्त ताकद लावावी लागणार आहे. नेमकी ही लढत कशी होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण प्रथमच पवार घराण्यात लढत होण्याची शक्यता असून खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे बारामती लोकसभेच्या उमेदवार असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. "भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजपा बरा"; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका
  2. पक्ष मी काढला अन् चिन्ह त्यांना दिलं हा सत्तेचा गैरवापर; शरद पवारांचा हल्लाबोल, इंडिया आघाडीत वाद असल्याचंही केलं मान्य
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.