ETV Bharat / state

पक्ष मी काढला अन् चिन्ह त्यांना दिलं हा सत्तेचा गैरवापर; शरद पवारांचा हल्लाबोल, इंडिया आघाडीत वाद असल्याचंही केलं मान्य

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 8:31 AM IST

Updated : Feb 21, 2024, 9:00 AM IST

Sharad Pawar in Kolhapur : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी आज (21 फेब्रुवारी) सकाळीच पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं. तसंच भाजपा, अजित पवार गट, निवडणूक आयोग यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Etv Bharat
Etv Bharat

कोल्हापूर Sharad Pawar in Kolhapur : शरद पवार यांनी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी पक्ष मी काढला अन् चिन्ह अजित पवार गटाला दिलं हा सत्तेचा गैरवापर आहे. तसंच निवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत पक्षांतरबंदी कायद्याबाबत काहीच होऊ शकत नाही. पक्षांतरबंदी कायदा सक्षम व्हावा यासाठी माझ्यासह खरगे, डी राजा, तृणमूल काँग्रेसनंही निवडणूक आयोगाला पत्र दिलंय, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

इंडिया आघाडीत मतभेद : इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांनी एकत्रित कांम करावं. राज्याच्या घटक पक्षांनीही एकत्र बसावं आणि सर्व विषयांवर चर्चा करावी. काही ठिकाणी इंडिया आघाडीमध्ये वाद-विवाद आहेत. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधे थोडे वाद आहेत, असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

जागावाटपावर चर्चा सुरू : निवडणूक जागावाटपाबाबत इंडिया आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही चर्चा झालेली आहे. त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर आम्ही विचार करत असल्याचं शरद पवार म्हणाले. इंडिया आघाडीनं सर्व घटकांशी चर्चा करावी अशी आंबेडकर यांची भावना आहे. जागावाटपाबाबत प्रत्येक पक्षाच्या काही अपेक्षा असतात. त्यावरही सखोल चर्चा सुरू असल्याचं शरद पवार म्हणाले.

राज्याबाहेर उमेदवार देणार : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी राज्याबाहेरही उमेदवार देणार आहे. लक्षद्वीप, अंदमानला राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. पक्षाची स्थापना मी केली. मात्र, पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याला देण्यात आलं. हा सत्तेचा गैरवापर आहे, अशी टीकाही शरद पवार यांनी भाजपावर केली.

शाहू महाराजांवर प्रतिक्रिया : शाहू महाराज छत्रपती हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा होती. त्यातच मंगळवारी शरद पवार यांनी शाहू महाराज यांची भेट घेतली. त्यामुळं या चर्चांना आणखी उधाण आलं. मात्र, आमच्या भेटीत लोकसभा लढवण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलंय.

हेही वाचा -

  1. "भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजपा बरा"; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका
  2. शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं, मविआचं लोकसभेच्या 39 जागांवर एकमत
  3. बारामतीमधील संस्थांच्या स्थापनेवेळी आरोप करणारे काय वयाचे होते? शरद पवारांचा अजित पवारांना खोचक टोला
Last Updated :Feb 21, 2024, 9:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.