ETV Bharat / politics

अमित शाहांपासून नारायण राणेंपर्यंत उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी; नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर - Uddhav Thackeray Speech

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 1:11 PM IST

Uddhav Thackeray Kankavli Sabha : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी (3 मे) कणकवली येथे जाहीर सभा पार पाडली. यावेळी ठाकरेंनी भाजपासह अमित शाह, नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Uddhav Thackeray Kankavli Sabha
उद्धव ठाकरेंची कणकवली सभा (Etv Bharat)

कणकवली Uddhav Thackeray Kankavli Sabha : ठाकरे गटाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी (3 मे) कणकवलीत सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे? : यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी मागील 10 वर्षांत देश लुटला. आता ते महाराष्ट्र लुटायला येतात. मात्र, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर मोदी-शाह यांनी लुटलेलं सर्वकाही वसूल केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शुभ बोलणाऱ्यांनी मला अडवण्याची आणि धमकीची भाषा वापरू नये, तसा प्रयत्न त्यांनी केला तर त्यांना आडवा केल्याशिवाय राहणार नाही. तसंच शाहांनी आम्हाला आव्हान करू नये. त्यांच्यात हिंमत असेल तर कोकणातील रिफायनरी रद्द करून दाखवावं. तसंच 2024 लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा देणाऱ्या मोदी-शाहांच्या भाजपाला जनता राजकीयदृष्ट्या तडीपार करेन. महाराष्ट्रातील जनता मशालीची धग काय असते ती भाजपाला दाखवून देईल. भाजपाचा संविधान बदलण्याचा डाव असून त्यांचा हा डाव देशवासीयांनी हाणून पाडावा", असं आवाहनही यावेळी ठाकरेंनी केलं.

नारायण राणेंवर हल्लाबोल : उद्धव ठाकरे यांनी यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावरही सडकून टीका केली. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी गेट आऊट म्हटलं होतं. मात्र भाजपानं त्यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांना आपल्याला धमक्या देऊ नये असंही ठाकरे म्हणाले. या निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल अशा आशयाचे उद्गारही ठाकरे यांनी काढले.

गेल्यावेळी माझी चूक झाली : "मोदी आणि शाहांनी आपले प्रकल्प पळवले. त्यांनी मुंबईचं वित्तीय केंद्र गुजरातला नेलं, ते आम्ही परत आणू. त्यांचे बार आपटलेत तरी अबकी बार.. अशी घोषणा केली जाते. कलावती यांचं घर राहुल गांधी यांनी दिलं. मात्र, अमित शाह लोकसभेत सांगताय की हे सर्व त्यांनी केलं. तसंच गेल्यावेळी माझी चूक झाली, त्यासाठी मी महाराष्ट्राची माफी मागतो. राज्यात सध्या फोडाफोडीचं राजकारण सुरू असून संकट आमच्यावर नाही तर तुमच्यावर आहे", असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यानं खळबळ; म्हणाले, उद्धव ठाकरे भाजपासोबत.... - Lok Sabha Election 2024
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावनिक साद, म्हणाले 'उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत' - Pm Modi On Uddhav Thackeray
  3. मुंबईत शिंदे गटाच्या कमकुवत उमेदवारांमुळं उद्धव ठाकरे गटाला मदत? - LOK SABHA ELECTION 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.