"नवऱ्याला संसदेत अलाऊड नसतं", सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना सुनावलं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 10:37 PM IST

Supriya Sule criticized Ajit Pawar and Sunetra Pawar over baramati lok sabha elections 2024

Lok Sabha Elections 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (25 फेब्रुवारी) कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर तुफान फटकेबाजी केली. तसंच विरोधकही सुप्रिया सुळे यांच्या इमानदारीचं कौतुक करतात, असं सांगत त्यांनी आपल्या संसदेतील भाषणाकडं उपस्थितांचं लक्ष वेधलं.

सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर टोलेबाजी केली

पुणे Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेदवार उभा राहणार अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय. या अनुषंगानं अजित पवार आणि सुनेत्रा पवार दोघंही प्रचार करत आहेत. याच मुद्द्यावरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना सुनावलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : वडगाव बुद्रुकमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "सत्ता कोणाची मक्तेदारी नाही. खाली हात आये है और खाली हात जायेंगे. माझं घर खासदारकीवर चालत नाही. मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय, आमचं लग्न म्हणजे आती क्या खंडाला, असं आहे. खंडाळ्यावर तुम्ही यायचं नाही, असं मी त्यांना अगोदरच सांगितलंय. त्यांनी (सदानंद सुळे) मतदारसंघात येऊन भाषणं ठोकली तर तुम्हाला चालेल का? संसदेत नवरा जाणार की मी जाणार? नवऱ्याला पार्लमेंटच्या परिसरात अलाऊड नसतं, त्यांना कॅन्टीनमध्येच बसावं लागतं. तुम्हाला कसा खासदार पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? त्यांनी कितीही चांगलं भाषण केलं तरी पार्लमेंटमध्ये जाऊन मला विषय मांडायचे असतात", असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ भाषण करणाऱ्या अजित पवारांना टोला लगावला.

पुढं त्या म्हणाल्या की, "महाराष्ट्रात विरोधी असे 10 खासदार आहेत, तर 38 खासदार हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे खासदार आहेत. त्या 38 पैकी एकाही खासदारानं महागाईचा 'म' देखील काढला का?", असा सवालही सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा -

  1. शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय 'यांची' हेडलाईन होत नाही; सुप्रिया सुळेंची टीका
  2. "विकासाचा रथ पुढं नेण्यासाठी.... "; सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना साद, प्रचारात सक्रिय
  3. नणंद विरुद्ध भावजय आमने सामने येणार? सुनेत्रा पवार यांच्या भाषणातील विधानामुळं चर्चेला उधाण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.