ETV Bharat / politics

मराठा आंदोलक आक्रमक; संभाजीनगरमध्ये अमित शाह यांच्या सभेचं बॅनर फाडलं; आंदोलकांची घोषणाबाजी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 7:09 PM IST

Amit Shah News : जिल्ह्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 5 मार्चला होणाऱ्या सभेसाठी लावण्यात आलेले बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी परवानगी घेतल्याशिवाय आंदोलन केलं जाऊ देत नाही. त्यामुळं आमच्या गावात देखील बॅनर लावताना ग्रामपंचायतीची परवानगी घ्यावी अन्यथा बॅनर लावू देणार नाही, असं म्हणत मराठा आंदोलकांनी शाह यांच्या सभेचं बॅनर फाडलंय.

maratha protesters aggressive tore down banners of Amit Shah sabha in Chhatrapati Sambhajinagar
मराठा आंदोलकांनी संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या सभेचं बॅनर फाडलं

मराठा आंदोलकांनी संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या सभेचं बॅनर फाडलं

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Amit Shah News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील मराठा समाज भाजपावर राग व्यक्त करताना दिसून येतोय. त्याचाच प्रत्यय आज (4 मार्च) वैजापूर तालुक्यात पाहायला मिळाला. गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचं बॅनर मराठा आंदोलकांनी फाडून निषेध व्यक्त केला. त्यामुळं काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न दिल्यानं राज्यात भाजपा विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. हा त्याचाच एक प्रकार असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात आणखीन इतर काही कारण आहे का? याबाबत मात्र पोलीस तपास करत आहेत.


केंद्रीय मंत्र्यांची होणार सभा : उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. शहरातील सांस्कृतिक मंडळ येथे अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. यानिमित्तानं संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली जात आहे. प्रत्येक रस्ता, चौक येथे सभेबाबत बॅनर आणि फलक लावण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात सभेचे बॅनर लावलेले होते. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून संतप्त मराठा बांधवांनी वैजापूर तालुक्यात लावण्यात आलेलं अमित शाह यांचं बॅनर फाडलं. वैजापूर तालुक्यातील टुणकी गावातील ही घटना असून त्याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

राज्य सरकारवर मराठा समाजाचा रोष : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा समाज विरुद्ध भाजपा असा संघर्ष पाहायला मिळतोय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एकेरी उल्लेख करून केलेली टीका, भाजपाच्या जिव्हारी लागली. त्यानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. त्यावरुन मराठा समाजानं समाज माध्यमांवर भाजपाविरोधात मोठ्या प्रमाणात टीका करत आक्षेप नोंदवला होता. त्यातच आता राजकीय नेत्यांच्या सभांना जाऊ नका, असं आवाहन मराठा समाजाच्या काही संघटनांनी केलंय. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या सभांचे लावलेले बॅनर फाडून मराठा युवक आपला रोष व्यक्त करत आहेत. त्यामुळं आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा -

  1. भाजपानं महाराष्ट्रावर लक्ष वाढवलं; जे.पी नड्डांपाठोपाठ अमित शाह विदर्भ दौऱ्यावर
  2. भाजपानं विश्वासघात केला, संजय राऊतांची देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांच्यावर टीका
  3. 'माझ्या माहितीप्रमाणे अमित शाह यांना पंतप्रधान व्हायचं आहे'; संजय राऊत यांचा मोठा दावा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.