ETV Bharat / politics

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 'मनुस्मृती'चा समावेश केल्यानं 'मनुचे राज्य' येणार का? राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू - Manusmriti Controversy

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 9:56 AM IST

Updated : May 25, 2024, 10:07 AM IST

Manusmriti Shlok Inclusion In School Syllabus : राज्य सरकारकडून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवद्गीता तर भारतीय मुल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्यात येणार आहे. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलंय. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी यावरून नाराजी व्यक्त केली. तर हिंदु जनजागृती समितीनं मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत समर्थन केलं.

political dispute over Manusmriti Shlok inclusion on maharashtra school syllabus
मनुस्मृतीतील श्लोकावरुन वाद पेटला! (ETV Bharat)

रमेश शिंदे आणि वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया (reporter)

मुंबई Manusmriti Shlok Inclusion In School Syllabus : महाराष्ट्र सरकारच्या शालेय विभागाकडून अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीता, मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतील श्लोक समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय. यामुळं राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय. या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सरकारवर निशाणा साधला जातोय. तर यात आता हिंदु जनजागृती समितीनंही उडी घेतल्यानं हा वाद अजूनच पेटण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय? : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 'एससीईआरटी'नं राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर असून त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्यात. मात्र, यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलंय. मुलांना भारतीय मुल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. परंतु, हा निर्णय सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या वादाचा ठरण्याची शक्यता आहे.


शरद पवार काय म्हणाले? : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार सुरू असल्याचे कानावर. यामधून लक्षात येते की, राज्य सरकारची संविधानाविषयीची मानसिकता काय आहे. सामाजिक संस्थांसह प्रागतिक लोकांनी दखल घेतली पाहिजे. मुलांच्या डोक्यात नेमकं काय घालायचं ते यांना कळत नाही," असा टोलादेखील लगावला.

काँग्रेसला उद्योग उरले नाहीत : "काँग्रेसला हल्लीच्या काळात काहीच उद्योग उरले नाहीत," अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. "मनाच्या श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश होणार की नाही, याविषयी मला माहिती नाही. मात्र, विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे."


राष्ट्रवादी काँग्रेसवर फुटीची वेळ आली नसती : "अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील वयोवृद्ध आणि ज्येष्ठ यांचा आदर करण्यास सांगणाऱ्या श्लोकाचा समावेश करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी विरोध केला. परंतु, आज त्यांच्या पक्षाची स्थिती पाहिली, तर ‘वयोवृद्ध’ म्हणून त्यांना कोण मान देतंय? त्यांच्या पक्षातून त्यांचेच नातेवाईक बहेर पडले. मनुस्मृतीमध्ये दिलेला श्लोक त्यांनी वेळेत वाचला असता, तर त्यांच्या पक्षावर आज ही वेळ आलीच नसती", अशी टीका हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केली.

मनूचे राज्य आणि चातुर्वण्य व्यवस्था येणार आहे?
पुढं ते म्हणाले की, "महाराष्ट्र शासनाच्या नवीन शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकाचा उल्लेख आल्यामुळं समस्त पुरोगाम्यांना पोटशुळ उठलाय. जणू काही आता मनूचे राज्य आणि चातुर्वण्य व्यवस्था येणार आहे? मुळात देशात राज्यघटनात्मक व्यवस्था, सर्वाेच्च न्यायालय असतांना अशा प्रकारची व्यवस्था लागू होईल का? धर्मशास्त्रामध्ये उल्लेख आहे की कलियुगासाठी पराशरस्मृतीचा उपयोग केला पाहिजे. यातील एका श्लोकात म्हटलंय की, ज्येष्ठ नागरिक, पालक, तपोवृद्ध, वयोवृद्ध यांचा आदर केल्यानं कीर्ती, बळ आणि यश वाढेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्मृती जाळल्याचा उल्लेख सातत्यानं केला जातो. परंतु 11 जानेवारी 1950 या दिवशी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात भाषण करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये वारसा हक्क आणि स्त्रियांसाठी दायभाग यांच्यासाठी मनस्मृतीचा उपयोग केला असल्याचं म्हटलंय", असा दावा रमेश शिंदे यांनी केला.

...अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारू : "शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न म्हणजे जुने बुरसटलेले विचार आणि वर्णभेदाला पुरस्कृत करण्याचा प्रकार आहे. त्यांना देशाच्या भवितव्याची चिंता नसून मनुवादी विचारांच्या ऱ्हासाची चिंताआहे, " टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केली. "तसंच अभ्यासक्रम आराखड्यातून हा आक्षेपार्ह भाग काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करू," असा इशाराही त्यांनी दिलाय.

मनुस्मृती काय आहे? : 'मनुस्मृती' हा ग्रंथ पुराणांमधील मनु नावाच्या ऋषींनी लिहिल्याचं मानलं जातं. यात जाती, लिंग आणि वयानुसार समाजातील विविध घटकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यांची निश्चिती करण्यात आली होती. विविध जातींमध्ये कोणत्या प्रकारचे सामाजिक व्यवहार होतील, स्त्री आणि पुरुषामध्ये संबंध जातीनुसार कसे असतील, कर रचना कशी असेल आदींची मांडणी मनुस्मृतीत करण्यात आली होती. मनुस्मृतीत चार वर्णांची म्हणजेच चातुर्वण्य व्यवस्थेची मांडणी करण्यात आली होती. यानुसार प्रत्येक जातीनं कोणते नियम पाळायचे हे यामध्ये ठरवून देण्यात आलं होतं.

डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं केलं दहन- 25 डिसेंबर 1927 रोजी रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. यासंदर्भात आंबेडकरांनी आपल्या फिलॉसॉफी ऑफ हिंदुइजम या ग्रंथात म्हटलंय की, "मनूने मनुस्मृतीत चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता. चातुर्वर्ण्यांचं पावित्र्य राखावं अशी शिकवण मनूनं दिली होती. त्यातूनच जातीव्यवस्थेला प्रोत्साहन मिळालं. मनूनं जातीव्यवस्था निर्माण केली असं म्हणता जरी येत नसलं तरी त्याची बीजं मनूनं पेरली आहेत."

हेही वाचा-

  1. 'या देशात पुन्हा मनुस्मृती राज येऊ देणार नाही, ते कागद मागायला आले तर त्यांना संविधान दाखवा'
  2. Prakash Ambedkar सर्वोच्च न्यायालयाच्या EWS निर्णयावर प्रकाश आंबेडकर आक्रमक, पाहा काय म्हणाले..
  3. मनुस्मृतीचे दहन करुन धुळ्यात स्त्री मुक्ती दिन साजरा
Last Updated : May 25, 2024, 10:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.