'खोके सरकार' आल्यानंतर राज्यात एकही नवीन उद्योग नाही-आदित्य ठाकरे

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Jan 21, 2024, 9:34 AM IST

Updated : Jan 21, 2024, 11:18 AM IST

Etv Bharat

Aaditya Thackeray Meeting at Prabhadevi : शिवसेना (ठाकरे गटाचे) आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात प्रभादेवीत शनिवारी (20 जानेवारी) जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यातून आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नेत्यांवर जोरदार टीका केली.

मुंबई Aaditya Thackeray Meeting at Prabhadevi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गटाचे) आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सुद्धा मैदानात उतरले आहेत. गिरगावनंतर शनिवारी (20 जानेवारी) प्रभादेवी येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे : "2024 ला आमचं सरकार येणार आणि त्यावेळी घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार" असा इशारा आदित्य ठाकरेंनी यावेळी दिला. "मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पुढील काही वर्षात कर्मचाऱ्यांना पगारही देता येणार नाही, अशी स्थिती निर्माण होईल. उद्धव ठाकरेंनी एवढं सगळं दिलं तरीही चाळीस लोकांची टोळी त्यांची होऊ शकली नाही. ती तुमची काय होणार? राहुल नार्वेकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नाही तर भाजपाच्या संविधानाप्रमाणे निकाल दिलाय, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

आमच्याकडे या नाहीतर जेलमध्ये टाकू : "आज विरोधकांमधील सर्वांना नोटीसा पाठवल्या जात आहेत. त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. आमचे राजन साळवी, रवींद्र वायकर यांना शिंदे गटात या, अशी ऑफर देण्यात आली होती. पण ते नाही म्हटल्यावर त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव टाकला जात आहे. या गद्दार गॅंगमध्ये भ्रष्ट चाळीस गद्दार आहेत. यांना अलीबाबा चाळीस चोर म्हणायचं. जनतेच्या पैशांवर हे गद्दार डल्ला मारत आहेत. तसंच आमचे जनता न्यायालय झाल्यानंतर भाजपा प्रणित सरकार बिथरले आहे. त्यामुळं ते आमच्या नेत्यांवर धाडी टाकत आहेत." सत्ताधारी सत्तेचा केवळ गैरवापर करत असल्याचंही ते म्हणाले.

बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा वापर राजकारणासाठी केला नाही : "देशात एकच हिंदुहृदयसम्राट आहेत. ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यांना ही पदवी जनतेनं दिलीय. रामराज्य आणणं हेच त्यांचं खरं हिंदुत्व होतं. पण आज खोकेबाज सरकार हिंदुत्वाचा गैरवापर करत आहे. दुसऱ्यांचा पक्ष फोडण्यासाठी आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजपाप्रणित खोटे सरकार हिंदुत्वाचा वापर करत आहे", अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केली.

प्राण जाए पर वचन न जाये : "जेव्हा राम मंदिराबाबत कोणी बोलत नव्हतं तेव्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. 'पहिले मंदिर... फिर सरकार' असं ते म्हणाले होते. आपलं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं आणि महिलांना सन्मान देणारं आहे. प्राण जाए पर वचन न जाये असं आपलं हिंदुत्व आहे. अच्छे दिन आने वाले है सांगून अनेकांनी खोट्या थापा मारल्या आहेत. पंधरा लाख खात्यामध्ये येणार होते ते आले का?", असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी केला. तसंच आपण जे वचन देतो ते पूर्ण करून दाखवतो". पण आपल्या आणि भाजपाच्या हिंदुत्वात फरक असल्याचंही ते म्हणाले.

गोळीबार करणारा सिद्धिविनायक मंदिराचा अध्यक्ष कसा? : पुढं ते म्हणाले की, "'खोके सरकार' आल्यानंतर राज्यात एकही नवीन उद्योग आला नाही. गणपती मिरवणूकीत गोळीबार करणाऱ्याला सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष केलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. पण आपलं सरकार आल्यावर अतिरेक्यांसाठी जो कायदा आहे, तो या टपोऱ्यांसाठी वापरणार, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. महिला खासदाराला शिवीगाळ करणारे आता गद्दार गँगचे मंत्री आहेत. उद्धव ठाकरेंनी अशा लोकांना बाहेर हाकललं असतं."

हेही वाचा -

  1. खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केलेल्या सूरज चव्हाण यांना २२ जानेवारीपर्यंत ईडी कोठडी
  2. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक
  3. 'वरळी' बस नाम ही काफी है! आगामी निवडणुकांच्या संघर्षाचं केंद्र
Last Updated :Jan 21, 2024, 11:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.