ETV Bharat / politics

मोदींनी स्वच्छता केलेल्या 'या' मंदिरात होणार आठवण पॉईंट; कोणतं आहे मंदिर?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 7:03 PM IST

PM Narendra Modi Kalaram Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारीला नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात जावून, भगवान श्री रामाचं दर्शन घेतलं. या पार्श्वभूमीवर मोदींनी स्वच्छता केलेल्या ठिकाणी 'आठवण पॉइंट' (Aathvan Point) म्हणून साकारला जाणार आहे.

Kalaram Temple And  PM Narendra Modi
काळाराम मंदिर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक PM Narendra Modi Kalaram Temple : नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारीला दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात स्वच्छता केली होती. या कृतीतून मोदींनी मंदिर स्वच्छतेचा संदेश संपूर्ण देशात दिला. या पार्श्वभूमीवर मोदींनी स्वच्छता केलेल्या ठिकाणी काळाराम मंदिर संस्थेतर्फे 'आठवण पॉइंट' (Aathvan Point) साकारला जाणार आहे. पंतप्रधानांनी स्वच्छतेसाठी वापरलेली बादली, मॉप तेथे ठेवून मंदिरात येणाऱ्या देशभरातील भाविकांना मंदिरासह आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला जाणार आहे.


देशाला स्वच्छतेचा संदेश : नाशिकमध्ये 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकला आले होते. त्या दरम्यान त्यांनी गोदा तीरावर पूजन केलं होतं. काळाराम मंदिरात रामरायाची आरती केली होती. अयोध्यातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं होतं. काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. काळारामाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा मारल्यानंतर त्यांनी मंदिरातील एका वृक्षाखाली झाडू मारून मॉपने स्वच्छता केली होती. त्यांनी या माध्यमातून मंदिर स्वच्छतेचा संदेश देशाला दिला होता. हा ऐतिहासिक क्षण कायमस्वरूपी जतन करण्यासाठी तसंच प्रत्येक भाविकाने मंदिर, घर, परिसर, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. या उद्देशाने मोदींनी स्वच्छता केलेल्या त्या ठिकाणी 'आठवण पॉईंट' साकारला जाणार आहे. या ठिकाणी मोदींच्या फोटोचा कटआउट लावून बादली, मॉप ठेवले जाणार आहे. तसंच स्वच्छतेबाबत प्रबोधन करणारे विविध संदेशही लावले जातील, असं काळाराम मंदिर संस्थानतर्फे सांगण्यात आलं आहे.




मोदींनी केलं होतं स्वच्छतेबाबत आवाहन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात स्वच्छता केल्यानंतर, राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमातील भाषणात देशातील नागरिकांना रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्तानं आपापल्या परिसरातील मंदिरात स्वच्छता करावी असं आवाहन केलं होतं. त्याला नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला. देशभरातील अनेक लहान, मोठ्या मंदिरात नागरिकांनी स्वच्छता करून पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद दिला.




भाविकांना उत्सुकता : नाशिकचे काळाराम मंदिर हे देशातील प्रसिद्ध मंदिर आहे. दररोज या ठिकाणी हजारो भाविक देशभरातून दर्शनासाठी येत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळारामाचं दर्शन घेतल्यानंतर या मंदिर परिसरात स्वच्छता केली. त्या ठिकाणी देशभरातून येणाऱ्या भाविकास खास आकर्षण निर्माण झालं आहे. मंदिरात येणारे भाविक मोदींनी कुठे स्वच्छता केली याबाबत चौकशी करत आहेत. तसंच या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ अधिक वाढला आहे. त्यामुळं आठवण पॉईंट साकारण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे.



आठवण पॉईंट साकारणार : काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता केली. त्या ठिकाणी आठवण पॉइंट उभारण्याचं नियोजन आहे. त्या माध्यमातून मोदींच्या दर्शनाच्या आठवणी कायम जपल्या जातील. शिवाय भाविकांमध्ये स्वच्छतेबाबत प्रबोधन केलं जाणार आहे. याबाबत लवकरच या ठिकाणी स्वच्छतेबाबतचे फलक लावून मोदींचं कटआउट लावलं जाणार असल्याचं, मंदिर प्रशासनाचे विश्वस्त मंदार जानोरकर यांनी सांगितलंय.


हेही वाचा -

  1. नाशिकच्या काळारामाच्या दर्शनानंतर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार
  2. उद्धव ठाकरेंनी घेतलं काळाराम मंदिरात दर्शन; भगवे कपडे, गळ्यात रुद्राक्षाची माळ केली परिधान
  3. राष्ट्रपतींच्या हस्ते नाशिकमधील काळाराम मंदिरात महाआरती करणार - उद्धव ठाकरे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.