ETV Bharat / entertainment

'शिवरायांचा छावा'मध्ये बहिर्जी नाईकची ऐतिहासिक भूमिका साकारणार रवी काळे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 3:29 PM IST

Updated : Feb 8, 2024, 2:59 PM IST

Ravi Kale as Bahirji Naik : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' प्रदर्शनासाठी तयार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटात बहिर्जी नाईक ही गुप्तहेराची व्यक्तीरेखा रवी काळे साकारणार आहेत.

Ravi Kale
बहिर्जी नाईकच्या भूमिकेत रवी काळे

मुंबई - Ravi Kale as Bahirji Naik : कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचे कसब अंगी असलेला अभिनेता रवी काळे यांनी मराठी, हिंदीसह, तामिळ, तेलगू चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' या चित्रपटातही ते आता स्वराज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दमदार भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रवी काळे प्रथमच ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. 'शिवरायांचा छावा' १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

आजवर विविधांगी भूमिका साकारणारे रवी काळे आता ऐतिहासिक भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना रवी काळे सांगतात की, "कोणत्याही कलाकारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळणे हे एक आव्हान असते आणि कलाकारालाही ते आव्हान स्वीकारायला आवडते. बहिर्जी नाईक यांची भूमिका करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. मला 'शिवरायांचा छावा' या चित्रपटात तशी संधी मिळाली ही नक्कीच आनंदाची बाब आहे."

मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी 'शिवरायांचा छावा' या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.

आजवर दिग्पाल लांजेकर यांनी 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेरशिवराज', 'सुभेदार' या 'शिवराज अष्टक' चित्रपट मालिकेतील पाच एतिहासिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र मोठ्या पडद्यावर मांडण्याचा त्यांचा हा स्तुत्य उपक्रम कौतुकाचा विषय ठरलाय. दरम्यान त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतुलनिय पराक्रमावर आधारित 'शिवरायांचा छावा' हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचा विस्तार करताना संभाजी महाराजांनी घेतलेल्या रयतेच्या हिताच्या भूमिका आणि त्यासाठी दाखवलेले धैर्य, शौर्य याची गाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दिग्पाल लांजेकरच्या सर्वच चित्रपटांना महाराष्ट्रीतील प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा -

  1. "अभी मैं जिंदा हूं", पूनम पांडेनं दिला जिवंत असल्याचा पुरावा, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...
  2. पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी खोटी, व्हिडिओ जारी करुन रोजलीनने व्यक्त केली शंका
  3. पूनम पांडेच्या मृत्यूवर चाहत्यांचा विश्वास बसेना! सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Last Updated : Feb 8, 2024, 2:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.