ETV Bharat / bharat

बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट प्रकणात 'एनआयए'चे 7 राज्यांमध्ये छापे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 2:24 PM IST

NIA raids multiple locations
NIA raids multiple locations

NIA raids multiple locations : लष्कर-ए-तैयबाच्या (एलईटी) दहशतवाद्यांकडून कैद्यांच्या कथित कट्टरपंथी बनवण्याच्या प्रकणात राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) आज सात राज्यांमध्ये छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून बेंगळुरू, तामिळनाडूसह सात राज्यांमध्ये छापेमारी सुरू आहे. तसंच NIA बंगळुरूत लष्कर-ए-तैयबानं तुरुंगात आत्मघाती हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी दोन फरार गुन्हेगारांसह आठ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं.

नवी दिल्ली NIA raids multiple locations : बंगळुरू तुरुंगातील कट्टरवाद प्रकरणातील आरोपींवर कारवाई करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) मंगळवारी सात राज्यांमध्ये 17 ठिकाणी शोधमोहीम राबवली. आज सकाळपासून कर्नाटक, तामिळनाडूसह इतर राज्यांमध्ये छापेमारीची कारवाई सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या संशयितांशी संबंधित ठिकाणावर छापे टाकण्यात येत आहेत.

आरोपींचं परदेशात पलायन : या वर्षी 12 जानेवारी रोजी, राष्ट्रीय तपास संस्थेनं बंगळुरूच्या तुरुंगात कट्टरवाद, 'फिदाईन' (आत्मघाती) हल्ल्यांचा कट रचल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोन फरारींसह आठ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. आरोपींमध्ये केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील टी. नसीरचा समावेश आहे. टी. नसीर 2013 पासून बेंगळुरूच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, तर जुनैद अहमद उर्फ जेडी तसंच सलमान खाननं पदेशात धूम ठोकलीय.

विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल : या प्रकरणात सय्यद सुहेल खान उर्फ सुहेल, मोहम्मद उमर उर्फ उमर, जाहिद तबरेज उर्फ जाहिद, सय्यद मुदस्सीर पाशा आणि मोहम्मद फैसल रब्बानी उर्फ सदाथ अशी आरोपींची नावं आहेत. सर्व आठ आरोपींवर भारतीय दंड संहिता, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, स्फोटक पदार्थ कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. बेंगळुरू शहर पोलिसांनी 18 जुलै 2023 रोजी आरोपींपैकी सात जणांच्या ताब्यातून शस्त्रे, दारूगोळा, हातबॉम्ब आणि वॉकी-टॉकी जप्त केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सात जण एका आरोपीच्या घरी जमले असताना ही कारवाई करण्यात आलीय.

आत्मघाती हल्ल्याचा रचला कट : ऑक्टोबर 2023 मध्ये एनआयएनं ताब्यात घेतलेल्या या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक स्फोट प्रकरणांमध्ये सामील असलेला टी. नसीर 2017 मध्ये बेंगळुरू तुरुंगात असताना इतर आरोपींच्या संपर्कात आला होता. त्याचवेळी सलाम खान एका POCSO प्रकरणात तुरुंगात असताना दुसऱ्या एका खुनाच्या गुन्ह्यात सामील होता. कारागृहातून सुटल्यानंतर जुनैद आणखी काही गुन्हे करून परदेशात पळून गेल्याची माहिती आहे. एनआयएच्या तपासानुसार, जुनैदनं त्याच्या सहआरोपींना परदेशातून निधी पाठवण्यास सुरुवात केली होती. तसंच कारागृहाच्या आत आणि बाहेर एलईटीच्या कार्यक्रमांना त्यानं प्रोत्साहन दिलं होतं. 'फिदाईन' (आत्मघाती) हल्ला करण्यासाठी त्यानं सलमानसोबत शस्त्रे, दारूगोळा, हँडग्रेनेड आणि वॉकी-टॉकी इतरांपर्यंत पोहोचवण्याचा कट रचला होता. तसंच कोर्टात जाताना जुनैदनं नसीरला पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यास मदत केली होती.

विविध ठिकाणी छापे : जुनैदनं त्याच्या सहआरोपींना हल्ल्यासाठी सरकारी बसेस जाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये शस्त्रे जप्त करून त्याचा कट उधळून लावला होता. या प्रकरणाचा तपास फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम 173(8) च्या तरतुदींनुसार केला जात आहे. गृह मंत्रालयानं बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे स्फोटाचा तपास एनआयएकडं सोपवल्यानंतर दोन दिवसांनी या प्रकरणात छापे टाकण्यात आले. बेंगळुरूच्या व्हाईटफील्ड भागात 1 मार्च रोजी कॅफेमध्ये स्फोट झाला होता. ज्यामध्ये अनेक जण जखमी झाले होते.

हे वाचलंत का :

  1. दोन बॉम्बस्फोटानंतर बिहारमधील दरभंगा येथे आढळले 6 जिवंत बॉम्ब
  2. 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता, टाडा न्यायालयाचा निकाल
  3. नवीन वर्षाच्या जल्लोषावर विरजण : मायानगरीत बॉम्बस्फोट घडवण्याची मुंबई पोलिसांना धमकी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.