ETV Bharat / bharat

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या कलाकाराचा अनोखा प्रयोग; पेन्सिलच्या टोकावर साकारला अयोध्येतील राम

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 8:58 PM IST

Updated : Feb 13, 2024, 10:17 PM IST

Lead Carving Pencil Nashik : नाशिकच्या जीवन जाधव या लीड कार्विंग आर्टिस्टनं चक्क अयोध्यातील रामलल्लाची मुर्ती पेन्सिलच्या टोकावर साकारत आपल्या कलेचं दर्शन घडवलं आहे. जीवन यानं आतापर्यंत अनेक कलाकृती पेन्सिलच्या टोकावर साकारत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाशिकचं नाव उंचावलं आहे.

lead carving artist Jeevan Jadhav carves an statue of Shri Ram on the tip of a pencil
नाशिकच्या जीवनचा अनोखा प्रयोग; पेन्सिलच्या टोकावर साकारले रामल्लला

जीवन जाधव यांनी पेन्सिलच्या टोकावर साकारले रामल्लला

नाशिक Lead Carving Pencil Nashik : अयोध्यात श्रीराम (रामल्लला) विराजमान झाल्यापासून अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून रामाप्रति आपली श्रद्धा अर्पण केलीय. अशात नाशिकमधील आयटी इंजिनियर जीवन जाधव या तरुणानं चक्क पेन्सिलच्या टोकावर श्रीरामाची सुबक मूर्ती साकारली आहे. मायक्रोस्कोपच्या आधारे त्यांनी ही मूर्ती साकारली असून 1.5 सेंटीमीटर आकाराची ही मूर्ती बहुतेक जगातील सर्वात लहान मूर्ती असल्याचा दावा जीवन जाधव यांनी केला आहे. जीवन यांनी आतापर्यंत पेन्सिलच्या लीडवर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, एपीजे अब्दुल कलाम, लालबागचा राजा, महेंद्रसिंग धोनी, सरदार वल्लभभाई पटेल, मायकल जॅक्सन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती, विठ्ठल मूर्ती, नाना पाटेकर अशा शंभरहून अधिक सुबक मूर्ती साकारल्या आहेत.

गिनीज बुक मध्ये झाली नोंद : कलाकार जीवन जाधव यांनी पेन्सिलच्या टोकावर विविध देवदेवता, महापुरुष, भारतीय संस्कृती, समाज सुधारक, खेळाडू, राजकीय नेते यांच्या शिल्पकृती साकारल्या आहेत. यासह त्याने एकाच पेन्सिलवर इंग्रजीतील ए टू झेड अक्षरे काढली आहेत. पेन्सिलच्या शिसावर 93 कडीची साखळी तयार करण्याचा विक्रमदेखील केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. जगातील सर्वात छोटी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती काढण्याचा विक्रम जीवन यांच्या नावावर आहे. फेसबुकनं घेतलेल्या आंतरराष्ट्रीय शिल्पकृती स्पर्धेत त्यांना अनेक बक्षीसदेखील मिळाली आहे.

कला माझ्यात आत्मसात होती : जीवन जाधव म्हणाले की, "लहानपणापासूनच मला चित्रकलेची आवड होती. शाळेत असतांना मी खडूवर कलाकृती साकारत होतो. त्यानंतर मात्र शिक्षणामुळं याकडं दुर्लक्ष झालं. इंजीनियरिंगचं शिक्षण घेत असताना माझ्या मित्रानं मला लीड कार्विंगचा व्हिडीओ पाठवला. ते बघून माझ्यातील कलाकार पुन्हा जागी झाला. आपण पण असंच काहीतरी करावं म्हणून मी पेन्सिलच्या लीडवर कार्विंग करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत भारतीय संस्कृती, समाज सुधारक, खेळाडू, राजकीय नेते, देवी देवतांच्या मुर्ती पेन्सिलच्या टोकावर साकारल्या आहेत." तसंच प्रत्येक व्यक्तीनं एक छंद जोपासला पाहिजे. माझी कला जगभर पोहचली यातून माझा आणि माझ्या शहराचा सन्मान झालाय. ही कला नाशिककरांना पाहता यावी यासाठी कलेचं प्रदर्शन भरवणार असल्याचंही जीवन जाधव यांनी सांगितलं.


मुलाचा अभिमान वाटतो : 'जीवनला लहानपणापासून कलेची आवडत होती. शाळेत असताना तो खडूवर कलाकृती करत होता. त्याच्या कलेची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली. ही आई म्हणून माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. नोकरी करत तो आपली कला जोपासतोय याचं कौतूक वाटतंय. पेन्सिलच्या टोकावर त्यानं कुठलीही मूर्ती साकारली तर तो सर्वप्रथम मला दाखवतो", असं जीवनची आई सुमन जाधव यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. रामलल्ला अयोध्येत विराजमान! पंतप्रधानांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना, पाहा सोहळ्याचा व्हिडिओ
  2. राममंदिराच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान 'रामभक्तीत लीन'; 'रामसेतू'च्या मूळ ठिकाणी देणार भेट, काय आहे या जागेचं महत्त्व?
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक तपस्वी आत्मा, त्यांची निवड देवानंच केली: ETV Bharat वर कैलाश खेर Exclusive
Last Updated : Feb 13, 2024, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.