ETV Bharat / bharat

क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या सासूचं कानपूरमध्ये निधन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 11:02 PM IST

क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या सासूचं कानपूरमध्ये निधन झालं आहे. सासूच्या निधनाची माहिती कळताच गावस्कर यांनी समालोचन अर्धवट सोडून कानपूर गाठलं.

Sunil gavasker
Sunil gavasker

कानपूर : भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावस्कर यांच्या सासू पुष्पा मेहरोत्रा (85) यांचं शुक्रवारी कानपूर येथील राहत्या घरी निधन झालं. भारत-इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या कसोटीदरम्यान सुनील गावस्कर समालोचन करत असताना त्यांना निधनाची माहिती मिळाली. त्यानंतर ते रात्री उशिरा कानपूरला पोहोचले. पुष्पा मेहरोत्रा यांच्या पार्थिवावर भगवतदास घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लखनौहून कारनं कानपूर गाठलं : सुनील गावस्कर यांना घटनेची माहिती मिळताच ते विशाखापट्टणमहून थेट लखनौ विमानतळावर पोहोचले. त्यानंतर रात्री कारनं ते कानपुरात दाखल झाले. अंत्यसंस्काराच्या वेळी सुनील गावस्कर यांची पत्नी मार्चेलिन, त्यांच्या बहिणी तुनिशा तसंच मासूही उपस्थित होत्या. त्यामुळं गावस्कर यापुढं विशाखापट्टणम कसोटीचा भाग असणार नाहीत.

गावस्कारांचे सासरे चामड्याचे व्यापारी आहेत : पुष्पा मेहरोत्रा यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक तसंच त्यांच्या कुटुंबीयांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या घरी धाव घेतली. गावस्कर यांचे सासरे चामड्याच्या व्यवसायात आहेत. त्यांचे सासरे बी.एल मेहरोत्रा हे कानपूरच्या मोठ्या उद्योगपतींपैकी एक होते. गावसकर यांनी 1974 मध्ये बी.एल मेहरोत्रा यांची मोठी मुलगी मार्शनिलशी लग्न केलं आहे. 1973 मध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान दोघांची भेट झाली होती.

गावसकर यांच्या आईचं 2022 मध्ये निधन : सुनील गावस्कर यांच्या आईचं 2022 मध्ये निधन झालं होतं. त्यांची आई मीना गावस्कर या 95 वर्षांच्या होत्या. आईच्या निधनाच्या वेळी गावस्कर भारत - बांगलादेश कसोटी सामन्यात ढाक्यात समालोचन करत होते.

गावस्कर यांची कारकीर्द : सुनील गावस्कर यांनी भारतासाठी 125 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्यांनी 10 हजार 122 धावा केल्या आहेत. 108 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 हजार 92 धावा त्याच्या नावावर आहेत. गावस्कर जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध आवाजांपैकी एक आहेत. निवृत्तीनंतर गावस्कर यांनी अनेक भूमिका बजावल्या आहेत. त्यांनी बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे.

हे वाचलंत का :

  1. खोट्या मृत्यूच्या बातमीबद्दल पूनम पांडेवर चौफेर टीका, तर राम गोपाल वर्मानं केलं समर्थन
  2. "अभी मैं जिंदा हूं", पूनम पांडेनं दिला जिवंत असल्याचा पुरावा, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...
  3. पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी खोटी, व्हिडिओ जारी करुन रोजलीनने व्यक्त केली शंका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.