ETV Bharat / bharat

मुख्यमंत्री होण्यासाठी दिला चक्क मुख्यमंत्रीपदाचाच राजीनामा; नितीशकुमारांनी आतापर्यंत कधी व कशी मारली पलटी?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 7:47 AM IST

Updated : Jan 28, 2024, 6:19 PM IST

Bihar Political Crisis : बिहारमध्ये मागील एका आठवडाभरापासून नितीश कुमार हे 'इंडिया' आघाडीची साथ सोडून भाजपासोबत जातील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्या चर्चा आता खऱ्या ठरल्या आहेत. नितीश कुमार हे पुन्हा एकदा 'एनडीए'सोबत गेले आहेत. बिहारमध्ये त्यांच्याच नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालंय. नितीश कुमार यांनी रविवारी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकाच व्यक्तीनं इतक्या वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा हा देशातील पहिलाच रेकॉर्ड आहे.

Bihar Political Crisis
तेजस्वी यादव आणि नितीश कुमार

पाटणा (बिहार) : Bihar Political Crisis : 'एनडीए'च्या जोरावर नितीश कुमार यांनी रविवारी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी एक नवा विक्रम तयार केलाय. 3 मार्च 2000 रोजी नितीश कुमार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, ते सरकार केवळ 7 दिवस टिकू शकलं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 24 नोव्हेंबर 2005 रोजी नितीश कुमार यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 20 मे 2014 ते 22 फेब्रुवारी 2015 पर्यंतचा कालावधी वगळता नितीश कुमार हे लगातार बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळं आतापर्यंत तब्बल नऊ वेळा नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

नितीश कुमार नवव्यांदा मुख्यमंत्री : आता बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झालंय. बिहार विधानसभेत 243 सदस्य असून, सदस्य संख्येनुसार एकूण 36 मंत्री केले जाऊ शकतात. 2020 मध्ये 'एनडीए' सरकारकडं 127 आमदार होते, तसंच विधान परिषदेत 50 हून अधिक सदस्य होते. त्यावेळी 30 मंत्री करण्यात आले होते. भाजपाचे 16, जेडीयूचे 12 आणि दोन इतर असे मंत्री होते. आता पुन्हा एनडीए सरकार स्थापन झालं असून, आमदारांची संख्या आता 128 झाली आहे.

नितीश कुमारच मुख्यमंत्री : रविवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. 'एनडीए' आणि 'महाआघाडी' या दोन्ही सरकारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहिले आहेत. नितीश कुमार हे 24 नोव्हेंबर 2005 ते 20 मे 2013 पर्यंत 'एनडीए'कडून मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर 22 फेब्रुवारी 2014 पर्यंत महाआघाडीच्या पाठिंब्याने ते पुन्हा मुख्यमंत्री झाले.

नितीश कुमार पुन्हा 'एनडीए'कडून मुख्यमंत्री : नितीश कुमार 27 जुलै 2017 ते 9 ऑगस्ट 2022 पर्यंत 'एनडीए'कडून बिहारचे मुख्यमंत्री राहिले होते. त्यानंतर 10 ऑगस्ट 2022 ते 28 जानेवारी 2024 पर्यंत ते महाआघाडीकडून मुख्यमंत्री राहिले. आता 28 जानेवारी 2024 ला ते पुन्हा एकदा एनडीएमधून मुख्यमंत्री झाले आहेत. 10 ऑगस्ट 2022 रोजी जेव्हा नितीश कुमार यांनी महाआघाडीचं सरकार स्थापन केलं तेव्हा 7 पक्ष सोबत होते. महाआघाडी सरकारला एकूण 164 आमदारांचा पाठिंबा होता. मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांनी प्रथम शपथ घेतली आणि त्यानंतर काही दिवसांनी राज्यपाल यांनी महाआघाडीतील 31 मंत्र्यांना शपथ दिली होती.

नितीश कुमार यांनी कितीवेळा पलटी मारली

  • पहिली टर्म : नितीश कुमार मार्च 2000 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री झाले. ते सरकार फक्त 7 दिवस टिकलं.
  • दुसरी टर्म (2005-2010) : 2005 बिहार विधानसभा निवडणुकीनंतर, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी हा कार्यकाळ पुर्ण केला.
  • तिसरी टर्म (2010-2014) : 2010 मध्ये नितीश कुमार यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी 17 मे 2014 रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं.
  • चौथी टर्म : वर्ष 2015 मध्ये नितीश कुमार यांचे जीतनराम मांझी यांच्याशी मतभेद सुरू झाले. जीतनराम मांझी यांच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या नितीश कुमार यांनी 2015 मध्ये पुन्हा एकदा चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
  • पाचवी टर्म (2015 – 2017) : 2015 च्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीनंतर 22 फेब्रुवारी 2015 रोजी नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. यावेळी जेडी(यू), आरजेडी आणि काँग्रेस या महाआघाडीने निवडणूक जिंकली. तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. मात्र, तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर नितीश कुमार यांनी 26 जुलै 2017 रोजी दोन वर्षांनी राजीनामा दिला.
  • सहावी टर्म (2017 - 2020) : राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी पलटी मारली आणि एनडीएमध्ये सामील झाले. काही तासांतच पुन्हा सत्तेत आले आणि मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. सुशील मोदींना बिहारचे उपमुख्यमंत्री करण्यात आलं.
  • सातवी टर्म (2020) : नितीश कुमार यांनी 2020 मध्ये सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी नितीश यांची आघाडी एनडीएशी होती. निवडणुकीत नितीश यांच्या पक्षाला कमी जागा मिळाल्या तरीही एनडीएने त्यांना मुख्यमंत्री केलं. मात्र, अवघ्या दोन वर्षांनंतर 9 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी एनडीए आघाडी सोडली आणि महागठबंधनमध्ये सामील झाले.
  • आठवी टर्म (2022) - 2024): 10 ऑगस्ट 2022 रोजी महाआघाडीचा नेता म्हणून आठव्यांदा मुख्यमंत्री म्हणून आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
  • नववी टर्म (2024) : आरजेडीसोबत काम करण्यात अडचण येते अस म्हणत नितीश कुमार पुन्हा इंडिया आघाडी बाहेर बडले आणि भाजपसोबत जात त्यांनी नववी वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

बिहारमधील संख्याबळ

  • राष्ट्रीय जनता दल - 79
  • भाजप - 78
  • जेडीयू - 45
  • काँग्रेस - 19
  • CPI(ML)L - 12
  • हम - 4
  • CPI -2
  • CPIM - 2
  • अपक्ष,इतर - 1
  • MIM - 1
  • एकूण - 243

हेही वाचा :

1 एका हातात राजीनामा तर दुसऱ्या हातात भाजपाचं समर्थन पत्र; नितीश कुमार 'खेला' करणारच

2 अखिलेश यादवांची काँग्रेससोबत युतीची घोषणा, उत्तर प्रदेशात देणार लोकसभेच्या 11 जागा

3 बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार राहणार की NDA पुन्हा येणार सत्तेत, जाणून घ्या विधानसभेचं गणित

Last Updated : Jan 28, 2024, 6:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.