Thane Deepotsava : ठाण्यात दीपोत्सवाचं आयोजन; सुंदर रांगोळ्या पाहण्यासाठी लोकांची गर्दी
ठाणे Thane Deepotsava : सध्या दिवाळीचा उत्साह सगळीकडं पाहायला मिळत आहे. घराघरात खमंग फराळाची रेलचल असून बच्चे कंपनी नवीन कपडे घालून फटाके फोडण्यात मग्न आहेत. ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा येथील अष्टविनायक चौकात युवापिढीच्या कलागुणांना वाव देणारा दीपोत्सव हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या दीपोत्सव कार्यक्रमाला मोठं स्वरूप आलं असून इथं शेकडो तरुण, तरुणी अप्रतिम रांगोळ्या काढताय. इथं 80 पेक्षा जास्त छोट्या मोठ्या रांगोळ्या येणाऱ्यांना मोहित करता आहेत. आकर्षक रंगसंगती, विविध विषय घेत या रांगोळ्या साकारल्या आहेत. या रांगोत्सवासोबतच दीपोत्सव देखील तेवढाच नयनरम्य आहे. लक्ष दिव्यांनी संपूर्ण चौक उजळून निघतोय. त्यानंतर होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीनं सारा आसमंत दणाणून जातो आहे. दरवर्षी हा आनंद लुटण्यासाठी ठाणेकर इथं गर्दी करत असतात.