Buldana Bus Accident : बुलडाणा अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर; अजित पवारांनी व्यक्त केले दुःख

By

Published : Jul 1, 2023, 9:14 PM IST

thumbnail

पुणे : नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा समृध्दी महामार्गावर (bus accident on Samriddhi Highway) बुलडाणा-सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्याने बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसने पेट घेतला. (Buldana Bus Accident) या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेत जखमी प्रवाश्यांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी आज समृध्दी महामार्गावर झालेल्या बस अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. अजित पवार म्हणाले की, समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरू आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्यावतीने सातत्याने करण्यात आली आहे. शासनाने आतातरी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.