थराराक! ब्रेक निकामी झालेल्या ट्रकनं बारा वाहनांना उडवलं, विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Jan 20, 2024, 9:50 AM IST

Truck Accidnet

Truck Accidnet in Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात विचित्र अपघात झालाय. ब्रेक निकामी झालेल्या ट्रकनं 12 वाहनांना उडवलं, या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय.

ब्रेक निकामी झालेल्या ट्रकनं बारा वाहनांना उडवलं

छत्रपती संभाजीनगर Truck Accidnet in Chhatrapati Sambhajinagar : ब्रेक निकामी झाल्यानं ट्रकनं रस्त्यावर जाणाऱ्या बारा वाहनांना धडक दिल्यानं विचित्र अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री शहरातील नक्षत्रवाडी या भागात घडली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. मनीषा शिंगणापुरे असं मृत महिलेचं नाव असून इतर जखमींना घाटी रुग्णालयासह, खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. रस्त्यात पाईपलाईन टाकण्याचं काम सुरु असल्यानं वाहतूक कोळंबा निर्माण झाला असतानाच, अचानक ब्रेक निकामी झालेला ट्रक थांबलेल्या वाहनांवर येऊन आदळला. अपघात इतका भीषण होता की प्रत्यक्षदर्शींचा थरकाप उडाला.

लोखंडी सळ्या घेऊन जाणारा ट्रक आला पुलाखाली : शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास नक्षत्रावाडी जवळ असलेल्या धुळे सोलापूर महामार्गाच्या पुलावरुन पैठण रस्त्यावर जाण्यासाठी लोखंडाच्या सळ्या घेऊन जाणारा सहा चाकी ट्रक पुलाखाली आला. त्यावेळी पैठण रस्त्यावर पाण्याच्या पाईप लाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्यांमुळं वाहतूक खोळंबा झाला होता. शेकडो वाहनं त्यात अडकल्यानं संथगतीनं वाहतूक पुढं सरकत होती. मात्र उतारावरच ट्रकचे ब्रेक निकामी झाले आणि रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना उडवत तो पुढं घुसला. एक दोन नव्हे तर बारा वाहनांना या ट्रकनं जबर धडक दिल्यानं एकच गोंधळ उडाला. दुचाकी, चारचाकी आणि पीकअप वाहनांना ही धडक बसली. या अपघातात मनीषा शिंगणापुरे (वय 35) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तसंच अन्य बारा लोकांना जबर दुखापत झाली असून सर्वांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय घाटीसह खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

उपचारासाठी झाला उशीर : पैठण रस्त्यावर सुरु असलेल्या कामामुळं वाहतूक कोंडी ही नेहमीचीच झालीय. त्यात ट्रक घुसल्यानं भीषण अपघात झाल्याची बातमी कळताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आणि ॲम्बुलन्स घटनास्थळी रवाना झाल्या. मात्र वाहतूक खोळंबा असल्यानं घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचण्यास आणि मदत कार्य करण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. सामान्य नागरिकांनी देखील यावेळी मोठ्या प्रमाणात मदतकार्यात सहकार्य केलं. तरी वाहन मोठ्या संख्येनं असल्यानं मदतकार्य मिळण्यास उशीर झाला. या अपघातात लोकांना जबर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

हेही वाचा :

  1. पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू
  2. कंटेनर पलटी होऊन लागलेल्या आगीत चालक जळून खाक, तब्बल तीन तास वाहतूक ठप्प
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.