ETV Bharat / state

प्रथमच खळखट्याक करून जेलमध्ये जाऊन आलेल्या मनसैनिकांचा जाहीर सत्कार

author img

By

Published : Jan 31, 2021, 10:41 PM IST

भिवंडी शहरातील टोरेंट पॉवर कंपनीने नागरिकांवर वाढीव वीजबिल लादले तसेच खोट्या केस दाखल केल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला होता. याविरोधात मनसेचे शहराध्यक्ष मनोज गुळवी आणि पदाधिकाऱ्यांनी अंजूरफाटा, खंडूपाडा येथील टोरेंट पॉवर कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. या कार्यकर्त्यांचा मनसेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

मनसैनिकांचा जाहीर सत्कार
मनसैनिकांचा जाहीर सत्कार

ठाणे - भिवंडी शहरातील टोरेंट पॉवर कंपनीने नागरिकांवर वाढीव वीजबिल लादले तसेच खोट्या केस दाखल केल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला होता. याविरोधात मनसेचे शहराध्यक्ष मनोज गुळवी आणि पदाधिकाऱ्यांनी अंजूरफाटा, खंडूपाडा येथील टोरेंट पॉवर कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर खळखट्याक करणाऱ्या या मनसे पदाधिकाऱ्यांना जेलची हवा सुद्धा खावी लागली, मात्र त्यांची जेलमधून सुटका होताच आज भिवंडीतील ब्राम्हण आळी येथील टिळक हॉलमध्ये त्यांचा मनसेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, सचिव संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

18 कार्यकर्त्यांना केली होती पोलिसांनी अटक

लॉकडाऊन काळात नागरिकांना वाढीव वीजबिल पाठवण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. वाढीव वीजबिल कमी करावे अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. मात्र कंपनीने मागणीची दखल न घेतल्याने, अंजुरफाटा आणि आमपाडा येथील टोरेंट पॉवरचे कार्यालय मनसैनिकांनी फोडले होते. याचदरम्यान भिवंडी पोलिसांनी 18 कार्यकर्त्यांना अटक केली होती. या कार्यकर्त्यांची जेलमधून सुटका झाल्यानंतर मनसेच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला. इंग्रजांसारखा जुलूम टोरेंटकडून भिवंडीकरांवर केला जात आहे. आमदार व खासदार करतात तरी काय? अशा प्रश्न विचारत यापुढे टोरेंटमुक्त भिवंडीचा नारा अविनाश जाधव यांनी यावेळी दिला.

मनसैनिकांचा जाहीर सत्कार

मनसेकडून आंदोलनाचा इशारा

यापूर्वी 7 जानेवारी रोजी वाढीव वीज बिलाविरोधात भिवंडीमध्ये मनसे आक्रमक झाली होती. मनसे कार्यकर्त्यांनी थेट टोरेंट पॉवर ऑफिस कार्यालय गाठून तोडफोड केली होती. नागरिकांना आलेले वाढीव वीजबिल तात्काळ कमी करण्यात यावे, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेविसेचे भिवंडी जिल्हाध्यक्ष संतोष साळवी यांनी दिला होता. वाढीव वीज बिलाबाबत वारंवार पाठपुरवठा करून देखील कोणताच तोडगा निघत नसल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत खळखट्याक आंदोलन केले. आता या आंदोलनाची मनसेने जबाबदारी घेतली असून, येत्या काळात नागरिकांना देण्यात आलेले वीजबिल कमी न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.