ETV Bharat / state

मुंब्र्यातून एक लाखाचे बक्षीस जाहीर असलेला फरार आरोपी अटकेत, महाराष्ट्र अन् उत्तर प्रदेश 'एटीएस'ची संयुक्त कारवाई

author img

By

Published : Sep 23, 2021, 1:08 AM IST

Updated : Sep 23, 2021, 1:30 AM IST

उत्तर प्रदेश एटीएसला हवा असलेला फरार आरोपीस उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने संयुक्तरित्या कारवाई करत मुंब्र्यातून अटक केली आहे. अब्दुल रज्जाक अब्दुल नबी मेमन, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर एटीएस लखनऊ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वय गुन्हा दाखल असून त्याची माहिती देणाऱ्यास उत्तर प्रदेश पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

न

ठाणे - उत्तर प्रदशेच्या लखनऊ पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यातील एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेल्या फरार आरोपीस महाराष्ट्र एटीएस व उत्तर प्रदेश एटीएस पथकाने मुंब्रा परिसरातून अटक केली आहे. अब्दुल रज्जाक अब्दुल नबी मेमन (वय 40 वर्षे, रा. ठाकूरपाडा रोशनी महलजवळ, मुंब्रा, ठाणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला उत्तर प्रदेश येथे नेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्याचे कार्यवाही बुधवारी (दि. 22 सप्टेंबर) रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

याबाबत पोलिसांकडून मिळाली अधिक माहिती अशी, उत्तर प्रदेश एटीएसच्या प्रमुखांनी महाराष्ट्रातील एटीएस प्रमुखांशी दूरध्वनीवरून चर्चा करुन इनामी फरार आरोपीच्या अटकेसाठी महाराष्ट्र एटीएसची मदत मागितली. त्यानंतर महाराष्ट्र एटीएस आणि उत्तर प्रदेश एटीएसच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत आरोपी अब्दुल रज्जाक अब्दुल नबी मेमन यास बुधवारी मुंब्रा येथून अटक केली आहे.

अब्दुल रज्जाक अब्दुल नबी मेमन याच्यावर एटीएस लखनऊ पोलीस ठाण्यामध्ये भा.दं.वि.चे कलम 419, 420, 467, 468, 471, 120 (ब), कलम 66 (डी) आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात आरोपी हा फरार होता. आरोपी मेमन हा मुंब्र्याच्या ठाकुरपाडा परिसरात वास्तव्या आहे, अशी माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली होती. मेमनला अटक करण्यासाठी मागच्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र एटीएस आणि उत्तर प्रदेश एटीएस पथके शोध घेत होते. अखेर पथकाला यश आले आहे. यापूर्वीही 20 मे, 2019 रोजी उत्तर प्रदेशातील एटीएसचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी आले होते.

अटक आरोपी मेमन यांच्या घरी दोन्ही एटीएसचे पथक धडकली असता मेमन याने पोटमाळ्यावर अडचणीतल्या जागेत लपून बसला होता. घरामध्ये शोध घेतल्यानंतर पोलीस पथक माघारी फिरण्याच्या तयारीत असताना खोलीच्या माळ्यावर एक नवीकोरी लुंगी पथकातील कर्मचाऱ्याला दिसली. त्या कर्मचाऱ्याला शंका आल्याने त्याने तेथे तपासणी केली. त्यावेळी आरोपी मेमन लपून बसलेला दिसला. त्याला पथकाने बाहेर काढत अटक केली. मेमनला उत्तर प्रदेशात नेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला उत्तर प्रदेशात नेण्यात येणार आहे.

हेही वाचा - कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांची वादग्रस्त दबंगगिरी; नाकाबंदीदरम्यान दुचाकीस्वाराचे फोडले डोके

Last Updated : Sep 23, 2021, 1:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.