ETV Bharat / state

कचराकुंडीत आढलेल्या त्या 'राज'ची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी ...

author img

By

Published : Dec 15, 2020, 7:14 PM IST

Death of a newborn Kalyan
नवजात बालकाचा मृत्यू

कल्याण पूर्वेतील तिसगाव आमराई परिसरात कचराकुंडीत आढळून आलेल्या एक दिवसाच्या नवजात अर्भकाला मनसे पदाधिकाऱ्यांनी जीवनदान देऊन, त्याचे नाव राज ठेवले होते. मात्र या 'राज'ची मृत्यूशी झुंज पाचव्या दिवशी अपयशी ठरली असून, त्याचा मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठाणे - कल्याण पूर्वेतील तिसगाव आमराई परिसरात कचराकुंडीत आढळून आलेल्या एक दिवसाच्या नवजात अर्भकाला मनसे पदाधिकाऱ्यांनी जीवनदान देऊन त्याचे नाव राज ठेवले होते. मात्र या 'राज'ची मृत्यूशी झुंज पाचव्या दिवशी अपयशी ठरली असून, त्याचा मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

९ डिसेंबर रोजी कचराकुंडीत आढळून आले होते बाळ

कल्याण पूर्वेतील तिसगाव रोड परिसरातील यशवंत हाईट्स इमारतीच्या पाठीमागे बुधवार ९ डिसेंबर रोजी सकाळी नाल्याचे काम करत असताना, कामगाराला एका ओढणीत बांधलेले नवजात अर्भक आढळून आले होते. त्याने याची माहिती मनसेचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांना दिली. समाजसेविका योगिता गायकवाड, मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी या बाळाला आधी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. मात्र पालिकेच्या रुग्णालयात बालरोगतज्ञ नसल्याने, या बालकाला इतरत्र नेण्याचा सल्ला पालिकेच्या डॉक्टरांनी दिला. त्यावेळी त्याल सिंडिकेट येथील मेट्रो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पाच दिवस होते व्हेंटिलेटरवर

गेले पाच दिवस त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, मात्र या बालकाच्या तब्यतीमध्ये सुधारणा होत असल्याने त्याला साध्या कक्षात हलवण्यात आले. आणि आज अखेर सहा दिवसानंतर या बाळाचा मृत्यू झाला. या बाळावर मेट्रो रुग्णालयात डॉ. झबक दाम्पत्याने मोफत उपचार केले.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बाळाचे नाव ठेवले 'राज'

कचराकुंडीत आढळून आलेल्या त्या एका दिवसाच्या बाळाचे राज असे नाव ठेवण्यात आले होते. या बाळाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याने मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, समाजसेविका योगिता गायकवाड व मनसेच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांना अश्रू अनावर झाले. बाळाच्या निधनाची बातमी समजताच कल्याणमधील सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे.

पालिका रुग्णालयात बालरोगतज्ञ नसल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप

केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात बालरोगतज्ञ नसल्याने, या बालकावर वेळेत उपचार न झाल्याने या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांनी केला आहे. तर याबाबत रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील यांना विचारले असता, आपण मिटिंगमध्ये असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. तर घटनेच्या दिवशी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र या बालकाला या ठिकाणी सोडून जाणाऱ्या व्यक्तीचा अद्याप पोलिसांना शोध लागलेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.