ETV Bharat / state

मनसुख हिरेन हत्या प्रकरण : एटीएसने दमणमधून ताब्यात घेतली व्होल्वो कार

author img

By

Published : Mar 23, 2021, 1:19 PM IST

Updated : Mar 23, 2021, 2:55 PM IST

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. एटीएसमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Volvo Car
वॉल्वो कार

ठाणे - मनसुख हिरेन प्रकरणात आतापर्यंत एनआयएने मुख्य आरोपी सचिन वाझेला अटक केली तर, एटीएसने वाझेंच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. त्यानंतर एटीएसने अनेक ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी रात्री एटीएसच्या पथकाने गुजरातच्या दमणमध्ये छापा टाकला. या ठिकाणावरून एक महागडी व्होल्वो कार जप्त करण्यात आली आहे. सचिन वाझेंच्या साथीदाराची ही गाडी असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आज (मंगळवार) एटीएसने दमणमधून एका व्यक्तीला अटक केली आहे. अभिषेक अग्रवाल, असे या व्यक्तीचे नाव आहे. या गाडीचा नेमका वापर का आणि कशासाठी केला गेला याचा तपास सुरू आहे.

गुजरातमधील बुकी मदत करत असल्याचा खुलासा -

४ मार्चच्या रात्री मनसुख हिरेन रहस्यमयरित्या गायब झाले होते. त्या रात्री ते ८ वाजल्यापासून ८.३० पर्यंत व्हॉट्सअ‌ॅप काॅलवर कोणाशी तरी सतत बोलत होते. तो नंबर अनोळखी होता. ही अनोळखी व्यक्ती कोण याचा एटीएस शोध घेणार होती. गुजरातमधील बुकी नरेश गोर याने दिलेल्या ८ बोगस सिमकार्डचा वापर मनसुखच्या हत्येच्या कटात वापरण्यात आले आहेत. यातील काही सिम कार्ड सचिन वाझे आणि विनायक शिंदे वापरत असल्याचे पुरावे मिळाले आहेत, अशी माहिती एटीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी अगोदरच दिलेली आहे.

अटक केलेल्या दोन आरोपींना पोलीस कोठडी -

मनसुख हिरेन यांची हत्या केल्याप्रकरणी नरेश रमणीकलाल गोर (वय ३१) आणि विनायक बाळासाहेब शिंदे (वय ५१) या दोघांना अटक केली आहे. अटक केलेला आरोपी नरेश गोर हा मुंबईत बुकी म्हणून बेकायदेशीर धंदा करत होता. त्यानेच सचिन वाझेंना सिमकार्ड पुरवले आहेत. दुसरा आरोपी विनायक शिंदे हा पोलीस दलातील बडतर्फ कर्मचारी आहे. लखन भैया बनावट चकमकीप्रकरणी शिंदे आरोपी होता.

सचिन वाझेंच्या महत्त्वाच्या गोष्टी तपास यंत्रणांकडे -

मनसुख हिरेन हत्येप्रकरणात आरोपी असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एक डायरी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या(एनआयए)च्या हाती लागली आहे. या डायरीमुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांच्या पाच आलिशान गाड्या, ५ लाखांची रोख रक्कम, पैसे मोजण्याचे मशीन आणि डायरी तपास यंत्रणांनी ताब्यात घेतल्या आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत हस्तगत केलेल्या गाड्या -

24 आणि 25 फेब्रुवारीच्या रात्री मुंबईतल्या प्रियदर्शनी पार्क जंक्शनजवळ एक स्कॉर्पिओ थांबली होती. मध्यरात्री पावणे दोन वाजता त्याच ठिकाणी एक पांढरी इनोव्हा आली आणि या दोन्ही गाड्या पुढे मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या दिशेने गेल्या. स्कॉर्पिओ अंबानी यांच्या घराबाहेर पार्क करण्यात आली. तर बरोबरची पांढरी इनोव्हा मुलुंड टोलनाका पार करून ठाण्याच्या दिशेने गेली आणि नंतर गायब झाली. वाझेंच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशीच सरकारी इनोव्हा कार जप्त करण्यात आली होती. या गाडीचा नंबर एमएच 01 झेडए 403 असा आहे. 17 मार्चला एक मर्सिडीज जप्त करण्यात आली. या गाडीचा नंबर एमएच 18 बीआर 9095 असा आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने यानंतर सचिन वाझे यांच्या ठाण्यातील साकेत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीत छापा टाकला. यावेळी चौकशीदरम्यान, पार्किंग लॉटमध्ये उभ्या करण्यात आलेली प्राडो ही आलिशान गाडी जप्त करण्यात आलेली आहे. या गाडीचा नंबर एमएच 02 सीओ 101 असा आहे. नवी मुंबईत असलेल्या नर्मदा ऑफ शोर कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीच्या नावावर असलेली मर्सिडीज गाडी राष्ट्रीय तपास यंत्रणेने जप्त केली आहे. या गाडीचा रजिस्टर क्रमांक हा नवी मुंबई आरटीओमधील असल्याचे समोर आले आहे. या गाडीचा नंबर एमएच 43 एआर 8697 असा आहे. आतापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणांनी पाच गाड्या जप्त केल्या आहेत. या सर्व गाड्या सचिन वाझे वापरत असल्याचे समोर आले आहे.

Last Updated : Mar 23, 2021, 2:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.