ETV Bharat / state

आशादायक; बारवी धरणात ९०.२० टक्के पाणीसाठा; पाणी समस्या मिटली

author img

By

Published : Aug 25, 2020, 4:41 PM IST

thane
बारवी धरण

गेल्या २४ तासात ठाण्याला २०.९ मिमी, कल्याणला १९.५मिमी, मुरबाडला १४, भिवंडीला २४, शहापूरला १५, उल्हासनगरला २० आणि अंबरनाथला २३ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे - बारवी धरणात मुबलक पाणीसाठा जमा झाल्यामुळे तूर्त तरी ठाणे जिल्ह्यातील पाणी समस्या मिटली आहे. या धरणात आतापर्यंत ९०.२० टक्के पाणीसाठा असून ते भरण्यासाठी अवघी एक मीटर पाणीपातळी बाकी असल्याची नोंद बारवी धरण प्रकल्प राबविणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळाने घेतली आहे.

गेल्या आठ दिवसापासून रविवारीपर्यत बऱ्यापैकी पाऊस झाला. सोमवारी मात्र जिल्ह्यात पावसाने काही अंशी विश्रांती घेतली आहे. गेल्या २४ तासात जिल्हाभरात अवघा २० मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. तसेच कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर आणि ठाणे महापालिकाच्या काही भागासह ग्रामीण क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील आंध्रा धरणात १३ मिमी पाऊस पडला असून त्यातही ६१ टक्के पाणीसाठा आहे.

मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४ मिमी पाऊस पडला. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सोमवारी विविध शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहक दिसून आले. गेल्या २४ तासांत ठाण्याला २०.९ मिमी, कल्याणला १९.५मिमी, मुरबाडला १४, भिवंडीला २४, शहापूरला १५, उल्हासनगरला २० आणि अंबरनाथला २३ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.

आतापर्यत धरणात ९५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर या आदीच मोडकसागर धरण १०० टक्के भरलेले आहे. तर तानसा धरण क्षेत्रात ४५ मिमी. पाऊस पडलेला असून आतापर्यंत ९९ टक्के पाणीसाठा या धरणात झाला आहे. मध्य वैतरणात ९५ टक्के पाणीसाठा असून या धरणात ५१ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडून केल्याचे सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.