ETV Bharat / state

मृत्यूचा बनावट दाखला देणारे डॉक्टरांचे 'त्रिकूट' गजाआड; एक फरार

author img

By

Published : Nov 4, 2020, 11:27 AM IST

शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अरुण चंदेल यांच्या नावाने बनावट मृत्यू दाखला देणाऱ्या डॉक्टरांच्या टोळीला पोलिसांनी पकडले आहे. या प्रकरणात चार डॉक्टरांचा समावेश असून यातील तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे.

3 doctors arrested for Texture forging death certificates in thane
मृत्यूचा बनावट दाखला देणारे डॉक्टरांचे त्रिकुट गजाआड; एक फरार

ठाणे - कल्याण पूर्वेतील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास, त्या रुग्णांच्या नातेवाईकांना मृत्यूचा बनावट दाखला देत असल्याचा धक्कादायक प्रकार मागील महिन्यात समोर आला होता. खळबळजनक बाब म्हणजे मृत्यू दाखल्यावर उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची सही व शिक्का बनावट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अरुण चंदेल यांनी साई स्वस्तिक रुग्णालयच्या चार डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांचा पुढील तपास सुरू होता. आता महिन्याभरानंतर फरार असलेल्या डॉक्टरांच्या त्रिकूटाला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. डॉ. स्वप्नील मुळे, डॉ. तुषार ढेंगे, डॉ. सतीश गीते अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी डॉक्टरांची नावे आहेत. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे.

असा झाला पर्दाफाश
कल्याण पूर्वेकडील आनंदवाडी परिसरात साई स्वस्तिक हे खासगी रुग्णालय आहे. कोरोनाच्या काळात या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. यावेळी रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या डेथ सर्टिफिकेटवर असलेली सही, शिक्का दुसऱ्याच डॉक्टरचा म्हणजेच उल्हासनगर येथील शासकीय सेंट्रल हॉस्पिटलमधील चीफ मेडिकल ऑफिसर अरुण चंदेल यांचा असल्याचे मृताच्या कुटुंबियांच्या लक्षात आले. सुदैवाने संबंधित मृत व्यक्तीचे नातेवाईक या डॉक्टरच्या ओळखीचे निघाल्याने त्यांनी डॉ. चंदेल यांना डेथ सर्टिफिकेट दाखवले असता आपल्या नावाचा गैरवापर केला जात असून डॉ. चंदेल यांचा या साई स्वस्तिक रुग्णालयाशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी डॉ. चंदेल यांनी ३ ऑक्टोबर रोजी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात विना परवानगी सही शिक्क्याचा वापर करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार केली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चार डॉक्टरांविरोधात भादंवी. कलम ४६८, ४७१, ४६२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

महापालिकेने केला रुग्णालयाचा परवाना रद्द
विशेष म्हणजे नगरसेवक महेश गायकवाड यांनीही याच साई स्वस्तिक रुग्णालयातील गैरकारभार दोन महिन्यापूर्वी समोर आणला होता. या रुग्णालयात त्यावेळी ११ दिवस एक महिला कोरोना या आजारावर उपचार घेत होती. त्याचे जवळपास ४ लाखाच्या घरात बिल झाले, परंतु तिची तब्येत खालावल्यामुळे तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने हलवण्यास सांगितले. शिफ्ट करण्याच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला होता. तसेच अजूनही ३ ते ४ रुग्ण या हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे मृत पावल्याचे महेश गायकवाड यांनी त्यावेळी सांगितले होते. यानंतरही दोन रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारले गेल्याची तक्रार कल्याण डोंबिवली मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्यामुळे मनपाने रुग्णालयास नोटीस पाठवून विचारणा केली होती. मात्र, रुग्णालयाने त्याचे उत्तर न दिल्याने रुग्णालयाचा परवाना मनपाने ३१ ऑगस्टपर्यंत रद्द केला होता.

आरोपीना चार दिवसाची पोलीस कोठडी
या गुन्ह्याचा अधिक तपास करणारे सपोनि के. एन. वाघ यांनी १ महिन्यानंतर ३ आरोपी डॉक्टरांना अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अशा प्रकारे आणखी किती जणांची फसवणूक करून डॉ. चंदेल यांच्या शिक्याचा वापर या आरोपींनी मृत्यू दाखले दिले याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.