ETV Bharat / state

जलसंपदा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे 'भीमे'ला पूर?

author img

By

Published : Oct 19, 2020, 4:04 PM IST

२००७ नंतर १३ वर्षांनी भीमेला महापूर आला आहे. या महापुरात शेकडो गावे पाण्याखाली बुडाली. या महापुराला पावसाबरोबरच जलसंपदा विभागाचे उदासीन धोरण कारणीभूत असल्याचा सूर उमटत आहे.

dam
धरण

सोलापूर - अतिवृष्टीचा इशारा असतानाही जलसंपदा विभागाने भरलेल्या उजनी धरणातून योग्यवेळी पुरेशा क्षमतेने पाणी सोडण्याबाबत उदासीनता दाखवली. त्यामुळेच पंढरपूरमध्ये मोठा पूर आला, असा आरोप नागरिक आणि जाणकारांनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात बुधवारी (ता. 14) रोजी विक्रमी पाऊस पडला. त्या दिवशीही धरणाची पाणीपातळी 111 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त होती. त्यात 13 ऑक्टबरच्या रात्री उजनी धरण क्षेत्रात 250 मीमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे पुणे आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला. तेव्हा धरणातून सर्व अतिरिक्त पाणी सोडून देण्याशिवाय प्रशासनापुढे पर्याय राहिला नाही. परिणामी एकाच दिवशी सव्वादोन लाख क्‍युसेकपर्यंत विसर्ग वाढवावा लागला. उजनी आणि वीर या दोन धरणांतून कोणतीही पूर्व कल्पना न देता 4 लाख क्यूसेक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे भीमेची पाणी पातळी प्रचंड वाढली.

उजनीतून सोडलेल्या जास्त पाण्यामुळे पूर जास्त वाढला

सोलापूर जिल्ह्यातील शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झालेले दहा प्रकल्प, भीमा, सीना, नीरा, माण, बोरी, भोगावती, नागझरी या नद्यांच्या पात्रातून उपसा सिंचनाद्वारे भिजणारे क्षेत्र हे सर्व उजनी प्रकल्पाचाच भाग आहे. जिल्ह्यातील सर्व लहान प्रकल्प आणि नद्यांचे पाणी शेवटी उजनीत येऊन मिळते. त्यामुळे उजनीमध्ये ऑक्टोबर महिन्याअगोदरच जास्त पाणीसाठा झाला होता. मात्र, तेव्हा जलसंपदा विभागाने पाण्याचा विसर्ग ठेवला नाही. परिणामी १४ ऑक्टोबरला मुसळधार पाऊस झाल्याने अचानक पाण्याचा विसर्ग करावा लागला. जलसंपदा विभागाने या संदर्भातील तपशीलवार माहिती जाहीर करावी. पूर टाळता आला नसता का? त्याची तीव्रता कमी करता आली नसती का याबद्दलही चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तब्बल तेरा वर्षांनंतर भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. उजनी धरण व्यवस्थापनाने हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याची वेळीच दखल घेतली असती तर महापूर आणि त्यामुळे झालेले नुकसानही टाळता आले असते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सोलापूर जिल्ह्यात 16 हजार कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले. अजूनही नदीकाठच्या गावांमध्ये लोक अडकले आहेत. जिल्ह्यात पावसामुळे 14 जणांचा मुत्यू झाला आहे. एका रात्रीत आलेल्या भीमेच्या पुरात ऊस, केळी, पपई, डाळिंब यासह इतर अनेक पिके वाहून गेली. पंढरपूर तालुक्‍यातील 95 गावातील 30 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.