ETV Bharat / state

ठरलं! कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री फडणवीसच करणार विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 10:22 PM IST

Kartiki Ekadashi 2023
कार्तिकी एकादशी

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. तर मंगळवारच्या बैठकीत कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते महापूजा होणार असल्याचे नक्की झाले आहे.

सोलापूर (पंढरपूर) Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असते. मात्र, यावर्षी दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकी यात्रेनिमित्त नेमके कोणाला बोलवायचं आणि सकल मराठा समाजाने या शासकीय महापूजेला विरोध केल्यानं पेच निर्माण झाला होता. जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून समाजाच्या पाचही मागण्या मान्य केल्यानं मराठा समाजाने आंदोलन मागे घेतलं आहे. 23 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिकी यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (Kumar Ashirwad) यांनी पंढरपूर येथे दिली.

पाचही मागण्या तत्काळ मान्य केल्या : पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासन व सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव तसेच सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी कुणबी जातीच्या नोंदी वेगाने शोधणे, मराठा भवन बांधणे, सारथीचे उपकेंद्र सुरू करणे, मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधणे आणि मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचा वेळ मिळवणे या मागण्या करण्यात आल्या. त्यावर जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मराठा समाजाने केलेल्या उपरोक्त पाचही मागण्या तात्काळ मान्य केल्या आहेत. प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री यांना शासकीय महापूजा करण्यास केलेला विरोध आणि आंदोलन मागे घेतलं आहे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री हे कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यास कोणतीही हरकत नसल्याचं, समाजाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

मराठा भवन बांधण्यासाठी पालकमंत्री यांच्याशी चर्चा : जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधीशी दुसऱ्यांदा बैठक घेऊन, मराठा समाजाचे आंदोलन मागे घेण्याबाबत महत्वपूर्ण भूमिका बजावली. जिल्ह्यातील कुणबी पुरावे नोंदी गोळा करण्याची मोहीम गतीने सुरू आहे. त्यात अधिक गती यावी यासाठी सर्व संबंधित तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना सुचित करण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच पंढरपूर येथे मराठा भवन बांधण्यासाठी पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच प्रांताधिकारी यांना मराठा भवनसाठी जागा शोधण्याबाबत ही कळविण्यात आलं आहे.

हेही वाचा -

  1. Vitthal Mahapuja By CM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तीन पिढ्यांसोबत विठ्ठलाची शासकीय महापूजा, ... हे घातले साकडे
  2. Ashadhi Wari 2023: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; नगर जिल्ह्यातील काळे दांपत्य ठरले मानाचे वारकरी
  3. Ashadhi Wari 2023 : विठुनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी, मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणारे शासकीय महापूजा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.