ETV Bharat / state

Stranded Workers Released: वेठबिगारी पद्धतीने डांबून ठेवलेल्या 26 कामगारांची तब्बल दहा महिन्यानंतर सुटका

author img

By

Published : Jul 10, 2023, 9:50 PM IST

Stranded Workers Released
कामगारांची सुटका

सोलापूर शहरात गेल्या दहा महिन्यांपासून एका बांधकाम ठेकेदाराने तेलंगणा राज्यातील 20 प्रौढ वेठबिगार कामगार आणि 6 अल्पवयीन बालकांना डांबून ठेवले होते. त्यांच्याकडून बळजबरीने बांधकाम काम करून घेतले जात होते. काम करून घेतल्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला त्या वेठबिगार कामगारांना दिला जात नव्हता. ही बाब सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांची सुटका जिल्हा प्रशासनाने केली आहे.

सोलापूर : या वेठबिगार कामगारांना तेलंगणा राज्यातील त्यांच्या गावात त्यांना सुखरूप पोहचविण्यात आले आहे. सोलापूर शहरातील सलगरवस्ती परिसरात डांबून ठेवलेल्या वेठबिगार कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून हे सर्व प्रकरण कामगार आयुक्तांकडे वर्ग करण्यात आले आहे. पुढील चौकशी करून ठेकेदारावर कडक कारवाई करणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

फक्त पोटाला जेवण : सोलापूर शहरातील बांधकाम ठेकेदाराने क्रूरतेचा कळसच गाठला होता. 20 प्रौढ व 6 अल्पवयीन बालकांना वेठबिगार म्हणून कामावर ठेवले. तसेच त्यांना विनापगारी केवळ पोटाला जेवण देवून गेल्या दहा महिन्यांपासून बांधकामावर राबवून घेतले जात होते. सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी ज्यावेळी वेठबिगार कामगारांची सुटका करत होते, त्यावेळी त्यांची अवस्था पाहून अधिकाऱ्यांचेही कंठ दाटून आले होते. या कामगारांची सुटका करण्यात सोलापूर प्रशासनाने तत्परता दाखविली आहे. त्यामुळे वेठबिगार कामगार आपल्या गावी पोहचताच कामगारांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.

रितसर करार करून आणले कामगार : सोलापूर जिल्ह्याच्या बाजूला असलेल्या तेलंगणा राज्यातील एका जिल्ह्यातील एका कामगार ठेकेदाराने 26 कामगारांना सोलापुरातील एका ठेकेदारांकडे रितसर करार करून गेल्या वर्षभरापूर्वी सोलापुरात आणले होते. मात्र, सुरुवातीला 40 हजार रुपये दिले होते. त्यानंतर या कामगारांना एक रुपयाही न देता केवळ त्यांना रोजचे जेवण देऊन गेल्या वर्षभरापासून त्यांना विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामावर राबवून घेतले जात होते. कामगारांकडून बाहेर सोडण्यासाठी तगादा लावला जात होता, तेव्हा त्यांना मारहाणही केली जात होती. यामध्ये 20 कामगार आणि 6 बालकांचा समावेश होता. या कामगारांना महिन्याला सहा हजार पगार देण्याचा उल्लेखही त्या करारामध्ये करण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराकडून कामगारांना पगार दिला जात नव्हता.


पगार नाही, उलट मारहाण : डांबून ठेवलेल्या या वेठबिगार कामगारांना कोणत्याच गोष्टींसाठी बाहेर सोडले जात नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याची बाब तेलंगणातील एका सामाजिक संस्थेच्या लक्षात आली. या सामाजिक संस्थेने रितसर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांना या प्रकरणाची चौकशी करुन पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पडदुणे यांनी उत्तरचे तहसीलदार सैफन नदाफ, नायब तहसीलदार विश्वजीत गंड, मंडळ अधिकारी अविनाश गायकवाड आणि तलाठी अमोल शिंदे यांच्या पथकाने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी शुक्रवारी धाड टाकली.


पहाटे तीन वाजेपर्यंत कारवाई : तेलंगाणामधील गोरगरीब कामगारांना डांबून ठेवल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने पोलिसांना पाचारण करून त्यांची सुटका करण्यात आली. तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना तेलंगणा येथील त्यांच्या गावी सुखरूप पोहोचविण्यात आले. या कामगारांची सुटका करण्यासाठी रात्री तीन वाजेपर्यंत काम करावे लागले. यासाठी शासनाच्या विविध 14 विभागांशी संपर्क करून या सुटकेची प्रक्रिया पार पाडावी लागली. यामध्ये पोलीस प्रशासन, कामगार आयुक्त, आरोग्य विभागाकडून तपासणी, टोल नाका तसेच त्यांच्या जाण्यासाठी गाडीची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी अनेकांशी पत्रव्यवहार करावा लागला. यामध्ये सर्व यंत्रणांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे त्या कामगारांना सुखरूप त्यांच्या गावी पोहचवता आले, याचे समाधान वाटत असल्याची माहिती प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिली आहे.

ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल होणार : तेलंगणामध्ये आदिवासी कामगारांच्या कल्याणासाठी काम करीत असलेल्या 'एनएएससी' या सामाजिक संघटनेच्या हेल्पलाईनवर आलेल्या फोन कॉलवरून या संस्थेचे कर्मचारी सोलापुरात पोहचले. या सामाजिक संस्थेने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून या कामगारांची सुटका केली. तर यामध्ये कामगारांना सोलापुरात आणणारा कामगार ठेकेदार हा तेलंगणाचाच आहे. त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.