ETV Bharat / state

'पावसाळ्यातील आपत्तीशी सामना करायला तयार रहा'

author img

By

Published : Jun 1, 2020, 9:02 PM IST

पालकमंत्री उदय सामंत यांनी आज सिंधुदुर्गनगरी येथे मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी कुडाळ येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी केली.

Uday Samant
उदय सामंत

सिंधुदुर्ग – चक्रीवादळ आणि कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी साधन सामुग्रीसह सज्ज रहावे. असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला आज दिले आहेत. महामार्गाचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेशही पालकमंत्री सामंत यांनी दिले.

पालकमंत्री उदय सामंत यांनी आज सिंधुदुर्गनगरी येथे मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी कुडाळ येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी केली.

या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे व वैशाली राजमाने उपस्थित होते.

जिल्ह्यात चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. यंत्रणांनी अत्यंत सतर्क रहावे, असे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गाची 85 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत कामे तातडीने पूर्ण करावीत. राष्ट्रीय महामार्गाबाबत भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. जिल्ह्याच्या संपर्कासाठी महत्त्वाचे घाट रस्ते सुरू राहण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी.

सरकारी विभागात समन्वय हवा-

घाट मार्गावर कोसळणाऱ्या दरडींबाबतची माहिती तातडीने मिळावी व त्या हटवता याव्यात. तसेच रस्त्यावर पडणारी झाडे, मुख्यतः आंबोली घाटामध्ये, त्वरीत हटवता यावीत यासाठी महसूल, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय ठेवावा. शोध व बचाव साहित्य अद्ययावत ठेवावे.

नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे-

आरोग्य विभागाने पावसाळ्यातील साथरोग नियंत्रणाबाबत दक्षता घ्यावी. स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. पुरामुळे दूषित होणाऱ्या पाणीसाठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठीची यंत्रणा सज्ज ठेवावी. वीज पुरवठा सुरळीत सुरू राहण्याबाबत संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. पूर क्षेत्रातील नागरिकांना निवाऱ्यासाठीची यंत्रणा तयार ठेवावी, पावसाळा कालावधीत पाटबंधारे विभागाने धरणातील पाण्याच्या विसर्गाची माहिती विहित वेळेत नदीकाठच्या गावांना द्यावी, विशेषतः तिलारी धरण क्षेत्रामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी सतर्क रहावे.

जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठा व विसर्ग यांची दैनंदिन माहिती महसूल विभागास व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास कळवावी, आदी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी या बैठकीत केल्या‌‌ आहेत.

बैठकीनंतर पालकमंत्री सामंत यांनी कुडाळ येथे महामार्गाच्या कामा पाहणी केली. सामंत यांनी महामार्गाच्या दोन्ही बाजूनी पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल, या पद्धतीने ड्रेनेज सिस्टीम तयार करावी. महार्गासाठी अधिग्रहित केलेल्या सर्व जमिनी ताब्यत घ्याव्यात, मंजूर सर्व मोबदले तातडीने द्यावेत, अशा सूचना केल्या आहेत.

येथे माणगाव फाट्यावर सर्कल उभारण्याबाबत ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे सल्लागार, कार्यकारी अभियंता व ठेकेदार यांच्यासोबत रत्नागिरी येथे बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.