ETV Bharat / state

महाराष्ट्र सीमाभागातील 197 विद्यार्थ्यांनी दिली दहावीची परीक्षा, नियमांचे तंतोतंत पालन

author img

By

Published : May 24, 2020, 3:30 PM IST

students gives Class X  exams
महाराष्ट्र सीमाभागातील विद्यार्थ्यांनी दिली दहावीची परीक्षा

default

सिंधुदुर्ग - सीमा भागातील गोव्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गोवा शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा सिंधुदुर्गातील पाच परीक्षा केंद्रावर शनिवारपासून सुरू झाली. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा शासनाच्या नियामांचे पालन करत घेण्यात येत आहे. सावंतवाडी तालुक्यात सातार्डा, आरोंदा केंद्रावर तर दोडामार्ग तालुक्यात भेडशी, आयी व चोर्ला केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे. या केंद्रावर एकूण 197 विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती गोवा शिक्षण मंडळाचे सचिव भगिरथ शेटये यांनी दिली.

सॅनिटाईज प्रश्नपत्रिका, सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच वर्गात मास्क लावून विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. सातार्डा केंद्रावर 71, आरोंदा 17, भेडशी 61, आयी 24 व चोर्ला केंद्रावर 24 असे एकूण 197 सिंधुदुर्गचे विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन परीक्षा घेण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची शारीरिक तपासणी करुनच परीक्षागृहात प्रवेश देण्यात येत आहे. शिवाय सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. केंद्राच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी, पोलीस व स्वयंसेवक यांची टीम कार्यरत आहे.

सातार्डा प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल केंद्रावर एकूण 71 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. केंद्र प्रमुख म्हणून आरोस विद्याविहार ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका सुषमा प्रवीण मांजरेकर काम पाहत आहेत. शिस्तबद्ध नियोजन व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला देण्यात आलेल्या प्राधान्यामुळे पालकांनी यावेळी समाधान व्यक्त केले. आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, पोलीस, पर्यवेक्षक अशी 20 जणांची टीम या केंद्रावर कार्यरत असल्याचे मांजरेकर यांनी सांगितले. परीक्षा केंद्राला गोवा बोर्ड व्हीजिटीअर ऑफिसर धुरी, शिक्षण विस्तार अधिकारी दुर्गा साळगावकर, सातार्डा सरपंच भरत मयेकर, पोलीस पाटील विनिता मयेकर, आरोग्य सेवक खेडकर आदींनी भेट दिली.

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सातार्डा इंग्लिश मीडीयम स्कूल कमिटी अध्यक्ष उदय परिपत्ये, सरपंच मयेकर, युवा कार्यकर्ते सागर प्रभू, योगेश गोवेकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. यावेळी डॉ. स्मिता शेलटे नाईक यांनी विद्यार्थ्यांना अर्सेनिक गोळ्या व मास्कचे मोफत वाटप केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.