ETV Bharat / state

'नवा रस्ता, नवा गाव', चुकीच्या पाट्यांमुळे ग्रामस्थ नाराज

author img

By

Published : Aug 4, 2020, 3:33 PM IST

सातारा-म्हसवड रस्त्यावर लोधवडे, मनकर्णवाडी, जाशी या गावांच्या नावाचे चुकीचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे नव्याने येण्याऱ्यांची फसगत होत आहे.

गावांची चुकीची नावे
गावांची चुकीची नावे

सातारा - सातारा-लातूर महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. या मार्गावर असणाऱ्या गावांच्या दिशादर्शक नावांचे फलक नव्याने लावण्यात आले आहेत. मात्र, अनेक गावांची नावे फलकांवर चुकीची टाकण्यात आली आहेत. चुकीची नावे टाकून जणू काय "नवा रस्ता, नवा गाव" बनवून गावांचे चुकीचे नामकरण करण्यात आले आहे. लोधवडेसारख्या प्रसिद्ध गावाच्या चुकीच्या नावाचा फलक बदलावा, अशी मागणी होत आहे.

सातारा-म्हसवड रस्त्यावर लोधवडे, मनकर्णवाडी, जाशी या गावांच्या नावाचे चुकीचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे नव्याने येणाऱ्यांची फसगत होत आहे. तर गावच्या नावाचे ‘नामांतर’ केल्याने गावकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

लोधवडे गावाने वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवून गावाचे नाव दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवले आहे. आदर्श गाव, तंटामुक्त गाव म्हणून लोधवडे गावाचा नावलौकिक व परिचय आहे. जलयुक्त शिवार योजना सुध्दा राज्यात लोधवडे गावाच्या धर्तीवर राबवण्यात आली तसेच माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या नावाने लोधवडे गाव प्रसिध्द आहे. माण तालुक्यातील दुष्काळी पाहणीसाठी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दौऱ्यावर आले असताना लोधवडे गावातच थांबले होते, तर माजी ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे, सिनेअभिनेते अमीर खान यांनी या गावाला आवर्जून भेटी दिल्या आहेत.

मात्र, लोधवडे या गावाच्या नावाची पाटी महामार्गावर लोधवाडी अशी लावण्यात आली आहे. अगदी मराठी आणि इंग्रजी भाषेतसुध्दा चुकीच्या नावाने. तर या गावच्या नावाच्या फलकानजीक काही फुटांच्या अंतरावर मनकर्णवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी सुध्दा चुकीच्या नावाचा फलक लावण्यात आला आहे. मनकर्णवाडी ऐवजी मकर्णवाडी, असा फलक लावण्यात आला आहे. तर थोडे पुढे जाताच जाशी गावचे जशी केले गेले आहे.

महामार्गावर असे चुकीच्या नावाचे फलक लावल्याने अनेकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे. तर नागरिकांमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे. महामार्गावर चुकीच्या नावाचे फलक लावून दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.