ETV Bharat / state

Womens Safety : महिला सुरक्षेच्या 'सातारा पॅटर्न'ची राज्यभरात होणार अंमलबजावणी

author img

By

Published : Mar 15, 2022, 5:02 PM IST

सातारा जिल्ह्यात (Satara Police) राबविण्यात येत असलेल्या महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रमाची (Womens Safety) राज्यभर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन, हा उपक्रम राज्यभर राबविण्यास मान्यता दिली आहे.

satara Womens Safety
महिला सुरक्षा फाईल फोटो

कराड (सातारा) - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रमाची (Womens Safety) राज्यभर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राज्यभर राबविण्यास मान्यता दिली आहे.

महिलांना स्वसंरक्षणाचे धडे -

महिला सुरक्षेसाठी अभिनव कार्यप्रणाली निर्माण करणारा आणि महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणारा पथदर्शी उपक्रम गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पथदर्शी उपक्रमाच्या कार्यप्रणालीचे उद्घाटन झाले होते. कायदेविषयक जागृती, पोलिसी कार्यपद्धतीत सुधारणा आणि सामान्य महिलांना स्वसंरक्षणाचे धडे , यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे.

पीडित महिला व बालकांना योजनांचा त्वरित लाभ -

महिला व बाल अत्याचाराच्या घटनांमध्ये वेगाने तपास करणे, आरोपींना तातडीने अटक करणे, लवकर आरोपपत्र दाखल करणे, आरोपींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करणे तसेच पिडीत महिला व बालकांना शासनाच्या योजनांचा त्वरित लाभ मिळवून देणे, यासाठी सातारा पोलीस विभागाने गंभीरपणे पावले उचलली. त्यामुळे हा उपक्रमाला मोठे यश मिळाले.

महिला सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल -

हा उपक्रम राज्यभर राबविण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई प्रयत्नशील होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राज्यभर राबविण्यास मान्यता दिली. त्याची घोषणा नुकतीच अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारचे हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

साताऱ्यात उपक्रमाला मिळालेले यश -

सातारा जिल्ह्यात १६ जुलै २०२१ पासून महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आतापर्यंत पाचशेहून अधिक युवतींना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण तर ३७ हजारांहून अधिक महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

गृहराज्यमंत्र्यांकडून सातारा पोलीस दलाचे अभिनंदन -

सातारा जिल्हा पोलीस दलाने महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राबविण्यासाठी घेतलेल्या कष्टामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असून महिला सुरक्षेच्या दृष्टीने तो महत्त्वपूर्ण ठरला आहे. हे ध्यानात घेऊन राज्य सरकारने हा उपक्रम आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा पोलिसांनी या पथदर्शी उपक्रमाची उपयुक्तता सिद्ध केल्यामुळेच त्याची व्याप्ती वाढवण्याचे सरकारने ठरवले आहे. त्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यासाठी सातारा पोलिसांचे मी अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.