ETV Bharat / state

साताऱ्यासह पाच जिल्ह्यात 'हनीट्रॅप'चे जाळे टाकणारी टोळी अटकेत

author img

By

Published : Mar 2, 2021, 5:13 PM IST

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकांना 'हनीटॅप'च्या जाळ्यात ओढणाऱ्या टोळीचा सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश केला. तीन आरोपींची चार दिवासांच्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

आरोपींसह पोलीस पथक
आरोपींसह पोलीस पथक

सातारा - अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकांना 'हनीटॅप'च्या जाळ्यात ओढणाऱ्या टोळीचा सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश केला. यामध्ये एका महिलेचा समावेश असून या टोळीने सातारा, पुणे, बारामती, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांना लुटल्याचे तपासात पुढे आले आहे.

पोलीस कोठडीत रवानगी

काजल प्रदीप मुळेकर (वय 28 वर्षे, रा. चव्हाणवस्ती थेऊर, ता. हवेली, जि. पुणे), अजिंक्य रावसाहेब नाळे (वय 23 वर्षे), वैभव प्रकाश नाळे (वय 28 वर्षे, दोघेही रा. करावागज, ता.बारामती, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तिघांनाही चार दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.

असे ओढले जाळ्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील एका बड्या व्यवसायिकाला एक वर्षापूर्वी हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून लुटण्यात आले होते. संबंधित व्यावसायिकाला एका महिलेने मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवून जाळ्यात ओढले. व्यावसायिकाला भेटण्यासाठी ही महिला सातारा बसस्थानकात आली. त्यानंतर व्यावसायिकाच्या मोटारीने दोघे ठोसेघर येथे गेले. तेथील एका हॉटेलमध्ये हे दोघे बसले असताना तेथे या महिलेचे भाऊ म्हणून तीन ते चार जण गेले. त्यांनी व्यावसायिकाला मारहाण करत त्याच्या गाडीतून साताऱ्यात आणले. 'तुझे अश्लील व्हिडीओ आमच्याकडे असून हे प्रकरण मिटविण्यासाठी पैसे द्यावे लागतील,' अशी धमकी दिली.

सहा लाख, सोने-चांदी अन् कारही दिली होती

संबंधित व्यवसायिकाने भीतीपोटी व बदनामी होऊ नये म्हणून त्या टोळीला सहा लाख रुपयांची रोकड, सोने, चांदी तसेच स्वत:ची अलीशान कारही दिली होती. फलटण येथे ही कार बेवारस आढळून आल्यानंतर पोलीस संबंधित व्यावसायिकापर्यंत पोहोचले. त्यानंतरच संबंधित व्यवसायिकाकडून हनीट्रॅपचे प्रकरण समोर आले. सातारा तालुका पोलिसांनी त्या व्यावसायिकाची तक्रार नोंदवून घेऊन तपास सुरू केला होता. पोलिसांना तब्बल एक वर्षानंतर या टोळीच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास यश आले.

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत'ने फोडली वाचा; अन् जीवा महालांच्या वंशंजाचे पुन्हा सुरू झाले शिक्षण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.