ETV Bharat / state

छोकरी सोबत मिळाली नोकरी! मंत्रीपूत्राने लग्नातच दिला नवरदेवाला नोकरीचा आहेर

author img

By

Published : May 15, 2022, 1:42 PM IST

सातार्‍यातील पाटण तालुक्यात एका विवाह समारंभात नवरदेवाला चक्क नोकरीची लॉटरी लागली. गृहराज्यमंत्री तथा पाटणचे आमदार शंभूराज देसाई संस्थापक असलेल्या शिवदौलत सहकारी बँकेच्या नोकर भरतीसाठी मुलाखत दिलेल्या नवरदेवाच्या हाती लग्नातच नोकरीची ऑर्डर पडली. छोकरी सोबत नोकरीही मिळाल्याने नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

The groom got a job order at the wedding
लग्नातच नवरदेवाला नोकरीचा आहेर

कराड (सातारा) - सातार्‍यातील पाटण तालुक्यात एका विवाह समारंभात नवरदेवाला चक्क नोकरीची लॉटरी लागली. छोकरी सोबत नोकरीही मिळाल्याने नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही. गृहराज्यमंत्री तथा पाटणचे आमदार शंभूराज देसाई संस्थापक असलेल्या शिवदौलत सहकारी बँकेच्या नोकर भरतीसाठी मुलाखत दिलेल्या नवरदेवाच्या हाती लग्नातच नोकरीची ऑर्डर पडली. या नोकरीरूपी आहेराची पाटण तालुक्यात सध्या जोरदार चर्चा आहे.

गृहराज्यमंत्र्यांच्या सुपूत्राकडून नवरदेवाला नोकरीच्या ऑर्डरचा आहेर

कोयना विभागातील लेंढोरी गावातील जगन्नाथ झोरे या उच्च शिक्षित तरूणाने सातारा जिल्ह्यातील नावाजलेल्या शिवदौलत सहकारी बँकेत नोकरीसाठी अर्ज केला होता. बँकेतील नोकर भरतीसाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे पूत्र यशराज देसाई यांनी अर्जदारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मुलाखतीवेळी जगन्नाथ झोरे याने यशराज देसाई यांना आपल्या लग्नाची पत्रिका देऊन लग्न सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. जगन्नाथ झोरे या युवकाच्या जिद्द, उमेद आणि उच्च शिक्षणाची दखल घेऊन त्याची शिवदौलत बँकेमध्ये क्लार्क (लिपिक) पदासाठी निवड केली. लग्न सोहळ्याला उपस्थित राहून वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्याच. तसेच शिवदौलत बँकेतील क्लार्क पदाच्या नोकरीचे थेट नियुक्ती पत्र देत सुखद धक्का दिला.

लोकनेत्यांच्या कार्याचा वारसा जपला

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे सुपूत्र यशराज देसाई हे नुकतेच लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या कारभारात सक्रिय झाले आहेत. या माध्यमातून लोकनेत्यांची चौथी पिढी राजकीय आणि सहकार क्षेत्रात कार्यरत झाली आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई हे गृहमंत्री असताना पोलीस भरतीत ग्रामीण भागातील मुले उंचीमध्ये कमी पडायची. त्यावेळी पोरांच्या पायाखाली वीट ठेऊन उंची मोजा, असे लोकनेते बाळासाहेब देसाई पोलीस अधिकार्‍यांना सांगायचे. यामागे लोकनेत्यांची जनतेबद्दलची तळमळ होती. म्हणून बाळासाहेब देसाई यांना लोकनेते म्हणून ओळखले जायचे. लोकनेत्यांच्या कार्याला साजेसे काम करताना त्यांचे पणतू यशराज देसाई यांनी एका तरूणाला त्याच्या लग्नात नोकरीची ऑडर देऊन लोकनेत्यांच्या विचारांचा वारसा जपला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.