ETV Bharat / state

Udyanraje Bhosle: ..तर इस्लामिक देशांप्रमाणे भारतातही राजेशाही असती! उदयनराजे भडकले

author img

By

Published : Dec 15, 2022, 4:14 PM IST

Updated : Dec 15, 2022, 5:02 PM IST

शिवाजी महाराजांनी मनात आणले असते तर आज इस्लामिक देशांप्रमाणे आपल्या देशातही राजेशाही दिसली असती, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे. जगातील इस्लामिक देशात आजही राजेशाही आहे. शिवाजी महाराजांनी मनात आणले असते तर आज आपल्या देशात लोकशाही दिसली असती का? आपलीही त्याच देशासारखी परिस्थिती असती असही राजे म्हणाले आहेत.

उदयनराजे भोसले
उदयनराजे भोसले

सातारा - स्वार्थासाठी जातीधर्मात तेढ निर्माण केली जात आहे. महापुरुषांविरोधात मानहानीची वक्तव्ये केली जात आहेत. जगातील सरगळ्यात मोठ्या लोकशाहीसाठी हे योग्य नाही असे मत खा. उदयनराजे भोसले यांनी मांडले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य कारभारात लोकांचा सहभाग असला पाहिजे असे वाटणारे छत्रपती शिवराय हे जगाच्या पाठीवर एकमेव राजे होते. मात्र, सध्या विविध मार्गांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होत आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी जाती-पातीमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. या विकृतीला वेळीच आवरले पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले आहेत.

भाजपाच्या प्रवक्त्यांपर्यंत वादग्रस्त विधाने - छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील आणि देशातील काही भाजपाच्या नेतेमंडळींनी केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून भाजपाच्या प्रवक्त्यांपर्यंत काही नेत्यांनी वादग्रस्त विधाने केली. या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांचे थेट वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

शिवाजी महाराजांच्या मूळ विचारांचा विसर - पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले म्हणाले की, 'थोर पुरुषांनी आपले आयुष्य लोकांसाठी वेचले. लोकांचे कल्याण व्हावे हाच त्यांचा ध्यास होता. असे असूनही वारंवार त्यांची बदनामी वेगवेगळ्या माध्यमातून केली जात आहे. चित्रपट असेल किंवा जाहीरपणे केली जाणारी वक्तव्ये असतील. का कुणास ठाऊक, पण ही विकृती दिवसेंदिवस वाढतेय. जग वेगाने पुढे जात आहे. लोकांनी फारसा विचार करणे बंद केले आहे, असे माझे ठाम मत आहे. प्रत्येकाचे जीवन व्यग्र झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ विचारांचा विसर पडताना पाहायला मिळत आहे. हे एका दिवसात झालेले नाहीत.

देशाचे २९ तुकडे व्हायला वेळ लागणार नाही - शिवाजी महाराजांना वाटलं असतं की राजेशाही अस्तित्वात ठेवावी, तर या देशात अजूनही राजेशाहीच असती. त्याकाळी जगात एकमेव शिवाजी महाराज होते की त्यांना वाटलं लोकांचा सहभाग राज्यकारभारात असायला हवा. त्यामुळे इथे लोकशाही अस्तित्वात आली. पण नंतर देशाची फाळणी झाली. आज जर आपण स्वत:ला सावरलं नाही, तर या देशाचे २९ तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रातही विदर्भ, खानदेश, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असे तुकडेही होतील. शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडल्यामुळे आपल्याला आजची ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. या परिस्थितीचा विचार मनात आला की दु:ख वाटतं”, अशा शब्दांत उदयनराजे भोसलेंनी खंत व्यक्त केली.

हे नक्की का घडतय? - यावरून चाललेल्या राजकारणाला मी फारसं महत्त्व देत नाही. यात राजकारण येऊच शकत नाही. इस्लामिक देशांमध्ये आजही राजेशाही आहेच. आज राजेशाही असती, तर ही वेळ आली नसती. पण शिवाजी महाराजांना वाटलं होतं की लोकांच्या म्हणण्याला महत्त्व असलं पाहिजे”, असं उदयनराजे भोसले म्हणाले. “हे सगळं का घडतंय ते मला माहिती नाही. शिवाजी महाराजांनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपलं कुटुंब म्हणून स्वीकारलं. आज ती भावना कुठे आहे? शिवाजी महाराजांच्या विचारांचा आधार घेऊनच आपण इथपर्यंत आलोय. त्यांच्याविषयीची आस्था कृतीतून दिसून आली पाहिजे”, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

Last Updated : Dec 15, 2022, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.