ETV Bharat / state

Satara Accident News: लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो पलटी होऊन २१ जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

author img

By

Published : Feb 22, 2023, 10:36 PM IST

लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेला टेम्पो पलटी होऊन २१ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातात जखमी झालेल्या चौघांची प्रकृती गंभीर आहे. साताऱ्यातील पाचगणीनजीक रस्त्यावरील वळणाचा टेम्पो चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात झाला आहे.

Satara Accident
टेम्पोचा अपघात

सातारा: जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेला टेम्पो पलटी होऊन २१ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. पाचगणीनजीक रस्त्यावरील वळणाचा टेम्पो चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात झाला. तत्काळ जखमींना उपचारासाठी पाचगणीच्या बेल एअर हॉस्पिटल आणि महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वऱ्हाडाचा टेम्पो पलटी: पालाना (मांढरदेव) येथील आनंदा थोंडिबा धायगुडे यांच्या मुलाचा बुधवारी (दि. २२) जावळी तालुक्यातील घोटेघर येथे ४.३० वाजता विवाह होता. त्यासाठी पालाना येथून २५ वऱ्हाडींना घेऊन टेम्पो (क्र. एम. एच. ४३ यू. व्ही. ७८६०) हा वाई-पाचगणीमार्गें घोटेघरच्या दिशेने जात होता. भरधाव टेम्पो चालकाला पाचगणी येथील एका वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी झाला.

अपघातात २१ जखमी, चौघे गंभीर: रस्त्यातील वळणावर टेम्पो पलटी होऊन २१ जण जखमी झाले. त्यातील चौघे जण गंभीर जखमी होते. या अपघाताची माहिती मिळताच पाचगणी येथील आपत्कालीन टीमचे सदस्य, पालिका कर्मचारी आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून गंभीर जखमींना बेल एअर हॉस्पिटल तर किरकोळ जखमींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

टेम्पो चालक ताब्यात: टेम्पो गाडीचा चालक भरधाव वेगात गाडी चालवत होता. त्यामुळे अपघात झाल्याचे टेम्पोतील वऱ्हाडींनी सांगितल्याने पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघात झालेले ठिकाण हे अपघातप्रवण क्षेत्र आहे. मागील महिन्यात याच ठिकाणी एसटी आणि कारचा अपघात झाला होता. त्यामुळे हे वळण हटविण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

हेही वाचा: Mumbai High Court : ...अन्यथा रहिवाशाची ताज हॉटेलला राहण्याची सोय करा; मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला झापले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.