ETV Bharat / state

पाटणमध्ये धाडसी चोरी, चाकूच्या धाकाने लाखाचे दागिने केले लंपास

author img

By

Published : Apr 7, 2021, 6:51 PM IST

विहे (ता. पाटण) गावातील घरात घुसून तीन अज्ञात चोरट्यांनी महिलेला चाकूचा धाक दाखवून 1 लाख 5 हजाराचे दागिने लंपास केले. तसेच एकास दांडक्याने मारहाणही केली. याप्रकरणी तीन अनोळखी चोरट्यांवर मल्हारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ

कराड (सातारा) - विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील विहे (ता. पाटण) गावातील घरात घुसून तीन अज्ञात चोरट्यांनी महिलेला चाकूचा धाक दाखवून 1 लाख 5 हजाराचे दागिने लंपास केले. तसेच एकास दांडक्याने मारहाणही केली. याप्रकरणी तीन अनोळखी चोरट्यांवर मल्हारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश रामचंद क्षीरसागर (वय 57 वर्षे) हे विहे गावातील मळ्यात राहतात. घराशेजारीच त्यांची शेती आहे. सोमवारी (दि. 5 एप्रिल) रात्री ते शेतात पाणी पाजण्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली होती. शेतातून आल्यानंतर ते घराबाहेरच झोपी गेले. घरामध्ये त्यांची पत्नी, सून आणि नातवंडे तर घराच्या छतावर मुलगा झोपला होता. मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोरटे मुख्य दरवाजा उघडून घरात घुसले. बेडरूममध्ये झोपलेल्या प्रकाश क्षीरसागर यांच्या सुनेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. मानेला हिसका बसल्यानंतर त्यांची सून जागी झाली. तिच्या समोर दोघेजण उभे होते. एकाने तिच्या गळ्याला चाकू लावून आवाज न करण्याची धमकी दिली. तसेच कानातील, पायातील दागिने काढून देण्यास सांगितले. त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकून घराबाहेर झोपलेले प्रकाश क्षीरसागर जागे झाले. त्यांनी कोण आहे रे, असे विचारताच घराबाहेर येऊन प्रकाश क्षीरसागर यांना दांडक्याने मारहाण करून चोरटे पळून गेले. तिघांना पळून जाताना त्यांनी पाहिले. या घटनेमुळे घरातील सर्वजण जागे झाले. चोरट्यांनी कपाट उचकटून लहान मुलांचे दागिनेही चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पाटणचे डीवायएसपी अशोक थोरात, पोलीस निरिक्षक एन.आर. चौखंडे, मल्हारपेठचे उपनिरिक्षक अजित पाटील हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच श्वान पथकाला पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. या चोरीमुळे विहे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

हेही वाचा - साताऱ्यातील युवकाचा खुन; तिघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.