ETV Bharat / state

विशेष : भाजप उदयनराजेंचा वापर करतंय? केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर समर्थकांचा अपेक्षाभंग

author img

By

Published : Jul 10, 2021, 2:14 AM IST

Updated : Jul 10, 2021, 4:06 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी विस्तार झाला. मंत्रिमंडळात 43 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, डॉ. भारती पाटील व कपिल पाटील त्यांनी पदभार स्वीकारला. भाजपने हा विस्तार करताना मराठा, आगरी, आदिवासी या समाजाला प्रतिनिधित्व देत राजकीय समतोल सांभाळला आहे.

े
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर समर्थकांचा अपेक्षाभंग

सातारा - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना भाजपने खासदार उदयनराजे भोसले यांना डावलल्याने साताऱ्यात उदयनराजे समर्थकांचा अपेक्षाभंग झाला आहे. 'मुळात यावेळी उदयनराजे फारसे इच्छुक नव्हते. त्यामुळे त्यांचे नावही चर्चेत नव्हते' असे काही जवळच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर 'भाजप त्यांच्या रीतीप्रमाणे उदयनराजे यांचा राजकीय वापर करत असल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना नोंदवले.

समर्थकांत डावलल्याची भावना

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी विस्तार झाला. मंत्रिमंडळात 43 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, डॉ. भारती पाटील व कपिल पाटील त्यांनी पदभार स्वीकारला. भाजपने हा विस्तार करताना मराठा, आगरी, आदिवासी या समाजाला प्रतिनिधित्व देत राजकीय समतोल सांभाळला आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यापुढे ठेवत असताना कोकणात शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठीच राणे यांना भाजपने ताकद दिल्याचे सांगितले जाते. मात्र, हे करताना राज्यसभा सदस्य, साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांना बाजूला ठेवण्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये पाहायला मिळते.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राजे समर्थकांचा अपेक्षाभंग

राष्ट्रवादी-भाजपने उठवला लाभ

'भाजपने उदयनराजे यांना डावलून मोठी चूक केली. त्याची किंमत पक्षाला उद्याच्या काळात मोजावी लागेल,' अशी प्रतिक्रिया सातारा हाॅकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केली. "उदयनराजेंच्या सरळ स्वभावाचा आजपर्यंत राष्ट्रवादी व भाजपने राजकीय लाभ उठवला. प्रत्येक वेळी असेच होत आले. यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी आम्हा कार्यकर्त्यांना मोठी अपेक्षा होती," असेही ते म्हणाले.

हेही वाचा - 'इथं जर शहाणपणा केलास तर तिकडे पाडणार ही दहशत निर्माण व्हायला हवी'

रणजितसिंह यांच्या बाबत भाजप साशंक

साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे राजकीय राजकीय विश्लेषण करताना म्हणाले, "भाजप श्रेष्ठींनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना आगामी काळातील निवडणुकांची राजकीय गणितं समोर ठेवली असावीत. सातारा जिल्ह्यातील माढा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे नावही यावेळी चर्चेत होते. त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदी असताना भाजपची माढातून उमेदवारी मागितली होती. यामुळे त्यांच्या पक्षनिष्ठेबाबत भाजप श्रेष्ठींनी विचार लक्षात घेऊन निर्णय घेतला असावा. त्यामुळे खासदार रणजितसिंह यांची वर्णी लागली नाही."

भाजपकडून वापर

'एखाद्याचा राजकीय वापर केल्यानंतर त्याला कसे फेकून द्यायचं हे भाजपला चांगले माहित आहे. रासपचे महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे ही भाजपच्या एकंदर कार्यपद्धतीची उदाहरणे सांगता येतील,' असेही मांडके म्हणाले. उदयनराजेंच्या वलयाचाही भाजपने वापर करून त्यांना बाजूला ठेवणल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत थेट उदयनराजेंनी कोठेही मत व्यक्त केले नाही. 'मुळात उदयनराजे स्वतः यावेळी उत्सुक नव्हते. काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याकडे विस्तारापूर्वी विचारणा केली होती. मात्र, उदयनराजे उत्सुक नसल्याने मंत्रिमंडळ समावेशाचा विषय पुढे झाला नाही' असे एका प्रमुख कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Last Updated : Jul 10, 2021, 4:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.