ETV Bharat / state

जुगारात हरल्याच्या रागातून मित्राचा खून, संशयिताला झारखंड-बांगलादेश सीमेवरुन अटक

author img

By

Published : Aug 3, 2021, 5:13 PM IST

Updated : Aug 3, 2021, 5:32 PM IST

मित्राचा खून करून झारखंडला पळून गेलेल्या संशयिताला कराड शहर पोलिसांनी झारखंड-बांगलादेश सीमेवरील गावातून ताब्यात घेतले. त्याने चाकू भोसकून मित्राचा खून केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. कराड न्यायालयाने संशयिताला 8 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

v
v

कराड (सातारा) - जुगारात 9 हजार 500 रूपये हरल्याच्या रागातून मित्राचा खून करून झारखंडला पळून गेलेल्या संशयिताला कराड शहर पोलिसांनी झारखंड-बांगलादेश सीमेवरील गावातून ताब्यात घेतले आहे. त्याने चाकूने भोसकून मित्राचा खून केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. कराड न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इस्माईल शताबुद्दीन शेख (वय 25 वर्षे, झारखंड), असे खून झालेल्याचे तर मोहंमद सेटू आलम हिजाबुल शेख (वय 23 वर्षे), असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

मृत इस्माईल शताबुद्दीन शेख
मृत इस्माईल शताबुद्दीन शेख

बेस्ट डिटेक्शनसाठी तपास पथकाची शिफारस करणार

मृतदेह कुजल्याने शवविच्छेदन करता येत नव्हते. त्यामुळे मृत्यू कशामुळे झाला आहे, याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. मृतदेह सापडलेल्या ठिकाणी कोणताही पुरावा नव्हता. मृत इस्माईल याला दारूचे व्यसन नव्हते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. तसेच मृताचे मित्र गावी गेल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि संशयावरून पोलिसांनी तपासाला सुरूवात करत खुनाचा छडा लावला. जुगारात इस्माईलने 9 हजार 500 रूपये जिंकले होते. तो ज्याच्या बरोबर जुगार खेळला होता, तो सर्वात आधी झारखंडला गेला होता. त्यामुळे त्याच्यावर लक्ष केंद्रीत करत पोलीस खुनाच्या मुळापर्यंत पोहोचले. कोणतेही धागेदोरे, पुरावा नसताना खुनाचा गुन्हा उघडकीस आणणार्‍या पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, उपनिरीक्षक अर्जुन चोरगे, पोलीस नाईक एम.एम.खान, संदीप पाटील यांच्या पथकाचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी अभिनंदन केले. तसेच बेस्ट डिटेक्शन अ‍ॅवार्डसाठी शिफारस करणार असल्याची माहितीही पत्रकारांशी बोलताना दिली.

माहिती देताना पोलीस अधीक्षक

खून झालेला तरूण होता बांधकाम मजूर

झारखंड राज्यातील कामगार कराडसह परिसरातील बांधकामावर मजूर म्हणून काम करत आहेत. भाड्याने खोल्या घेऊन ते कराड आणि परिसरात राहिले आहेत. अशांपैकी इस्माईल शताबुद्धीन शेख हा दि. 6 जुलै रोजी कामावर गेला. मात्र, तो बेपत्ता असल्याची नोंद दि.10 जुलै रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात झाली होती. त्यावरून पोलीस तपास करत होते. दरम्यान, दि.13 जुलै रोजी गोळेश्वर (ता. कराड) गावच्या हद्दीत नदीकाठच्या एका उसाच्या शेतात पुरूषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तसेच कुजलेला मृतदेह बेपत्ता इस्माईलचा असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

चांदीची चेन बनली तपासाचा धागा

पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांना झारखंडवरून बोलावून घेतले. त्यांचे जबाब घेतले. पण, त्यांचा कोणावरही संशय नव्हता. तसेच तक्रारही नव्हती. मृतदेह सापडलेल्या ठिकाणी केवळ तुटलेली चांदीची चेनचा पोलिसांना मिळाली होती. ती सुध्दा मृताची नव्हती. त्यामुळे घटनेचा उलघडा करून आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते. दुसर्‍या मजुराने बुकिंग केलेल्या तिकिटावर एकजण झारखंडला गेल्याची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी अन्य मजुरांना चौकशीसाठी बोलावून घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत आणि संशयीत हे जुगार खेळत होते, अशी माहिती मिळाली. हाच धागा पकडून कराड पोलिसांच्या एका पथकाला झारखंडला पाठविण्यात आले. या पथकाने बांगलादेश सिमेपासून 18 कि.मी. अंतरावर असलेल्या झारखंडच्या एका गावातून संशयीत मोहंमद सेटू आलम हिजाबुल शेखला ताब्यात घेऊन कराडात आणले. चौकशीत त्याने इस्माईलचा चाकूने भोसकून खून केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडील 9 हजार 500 रूपये काढून घेतल्याचेही सांगितले.

संशयितावर झारखंडमध्येही होता खुनाचा गुन्हा

मित्राच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मोहंमद शेख याच्यावर झारखंडमध्येही पूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती कराड पोलिसांना मिळाली आहे. भाच्याचा खून करणार्‍याचा मोहंमद याने खून केला होता. त्यामुळे संशयित मोहंमद हा खूनशी प्रवृत्तीचा असल्याची बाब तपासात समोर आली आहे.

झारखंड पोलिसांच्या मदतीविना कराड पोलिसांची कारवाई

संशयिताला ताब्यात घेण्यासाठी झारखंडला गेलेल्या कराड पोलिसांना तेथील स्थानिक पोलिसांची मदत न घेता स्वत:च त्याच्या गावात जाऊन संशयिताला ताब्यात घेतले. स्थानिक पोलीस मदत करतीलच, याची खात्री नसते. कधी-कधी स्थानिक पोलीसच संशयितांना मदत करतात, असा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळेच आम्ही स्वत:च ही कारवाई केल्याचे तपास पथकातील उपनिरीक्षक अर्जुन चोरगे, पोलीस नाईक एम.एम.खान, संदीप पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - जिगरबाज वीज कर्मचार्‍यांच्या धाडसाला सातारा जिल्हाधिकार्‍यांचा सलाम

Last Updated : Aug 3, 2021, 5:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.