ETV Bharat / state

सांगली : अवघ्या 72 तासांत तयार झालेल्या कोविड रुग्णालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

author img

By

Published : Sep 2, 2020, 10:03 PM IST

Updated : Sep 2, 2020, 10:29 PM IST

सांगली जिल्ह्यातील तासगावमधील महिला तंत्रनिकेतनमध्ये कोविड रुग्णालयाचे निर्माण करण्यात आले आहे. हे रुग्णालय 72 तासांमध्ये करण्यात आले आहे. याचे लोकार्पण आज (2 सप्टें) पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

jayant patil
उद्घाटन करताना पालकमंत्री

सांगली - अवघ्या 72 तासांमध्ये सांगलीच्या तासगावमध्ये कोविड रुग्णालयाचे निर्माण करण्यात आले आहे. शासकीय महिला तंत्रनिकेतनमध्ये 70 खाटांचे ऑक्सिजनयुक्त रुग्णालय उभारण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन पार पडले. खासदार संजय पाटील यांच्या पुढाकाराने याची निर्मिती करण्यात आली आहे.

बोलताना पालकमंत्री जयंत पाटील
सांगली जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सात दिवसांमध्ये जवळपास तीन हजारांहून अधिक रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. अनेक ठिकाणी खाटा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणाही तोकडी पडत असल्याचे समोर आलेले आहे. यामुळे ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी कोरोना रुग्णालय निर्माण करण्याबाबत मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी पुढाकार घेऊन तासगावमध्ये तासगाव नगरपालिका, स्थानिक डॉक्टर व लोकवर्गणीतून 70 खाटांचे कोरोना रुग्णालय उभारले आहे. तासगाव शहरातील शासकीय महिला तंत्रनिकेतनमध्ये हे कोरोना सेंटर सुरू करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या रुग्णालयात 63 ऑक्सिजन खाटा, 7 आयसीयू खाटा उपलब्ध करण्यात आले आहेत. जसजशी गरज भासेल तशी या ठिकाणची खाटा आणि बाकी व्यवस्था वाढवण्यात येणार असल्याची माहिती उद्घाटनावेळी खासदार संजय पाटील यांनी दिली आहे.

तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या या कोरोना सेंटरमुळे मोठी मदत होईल आणि मिरजमधील कोविड रुग्णालयावरचा ताण कमी होऊन मृत्युचे प्रमाण रोखण्यास मदत होईल, असा विश्वास जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबईसह इतर ठिकाणाहून 40 व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात यश मिळालेला आहे. त्याचबरोबर मुंबईतून वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धतेबाबत प्रयत्न सुरू असल्याचेही पालकमंत्री पाटील म्हणाले.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा, औद्योगिक पुरवठा बंद करुन रुग्णांसाठी वापरणार ऑक्सिजन

पुण्यात एका पत्रकाराचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला ही दुर्दैवी बाब असल्याचे मत जलसंपदामंत्री पाटील यांनी व्यक्त केले. राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून ऑक्‍सिजन निर्मिती करण्यात येणाऱ्या कारखानदारांची पूर्ण क्षमता वापरून ऑक्सिजन निर्मिती करण्यात येत आहे. तसेच औद्योगिक ऑक्सिजन पुरवठा बंद करुन फक्त रुग्णांच्यासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलणाऱ्या डाॅक्टरवर इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल

Last Updated : Sep 2, 2020, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.