ETV Bharat / state

मुंबईच्या धर्तीवर ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देण्यासाठी 'नुतन कोविड सेंटर' सज्ज

author img

By

Published : May 24, 2021, 3:26 PM IST

Updated : May 24, 2021, 4:26 PM IST

सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी शासकीय दराच्या निम्मे दर आकारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. ऋतूज माळी यांनी दिली.

कोविड सेंटर
कोविड सेंटर

सांगली - ग्रामीण भागातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू रूग्णांना शासकीय दरापेक्षा अर्ध्या दराने उपचार सेवा देण्याचे काम राष्ट्रीय न्याय संशोधन संस्थेच्या नुतन कोविड रुग्णालयाच्या माध्यमातून कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथे करण्यात येत आहे. मुंबईच्या धर्तीवर फिवर ओपीडीही याठिकाणी सुरू करण्यात आली असून उपचारासह कोरोना केअर सेंटरही सुरू करण्यात आल्याने कवठेमहांकाळ तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना आधार ठरणार आहे.

बोलताना माळी
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. सर्वाधिक प्रादुर्भाव हा ग्रामीण भागात आहे. अधिक प्रमाणात ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना उपचारासाठी थेट शहरात धाव घ्यावी लागते. पण, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळेल याची शाश्वती नाही. यातून ही बेड मिळाला तर सर्व सामान्य रुग्णाला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची अडचण ओळखून कवठेमंकाळ स्थित असणाऱ्या राष्ट्रीय न्याय संशोधन संस्था संचलित नूतन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातून नरसिंहगाव याठिकाणी कोविड रुग्णालय व कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आला आहे. पन्नास बेडची क्षमता असणाऱ्या या ठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता आहे. त्याचबरोबर सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांच्यासाठी केअर सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर या ठिकाणी फिवर ओपीडी सुरू करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात मुंबई महापालिकेच्या रुग्णालयामध्ये कोरोनाच्या पाहिल्या लाटेत काम केलेले डॉ. ऋतूज माळी आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांमार्फत उपचार होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या रूग्णालयात शासकीय दरापेक्षा निम्म्या दराने पैसे आकारून उपचार केले जाणार आहेत. ज्यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

सामजिक संस्थेकडून गरजू रुग्णांना मदतीचा हात

राष्ट्रीय न्याय संशोधन संस्थेचे सचिव डॉ. रामलिंग माळी म्हणाले, संस्थेच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण आणि कायदा या क्षेत्रात काम करते. तर या संस्थेच्या माध्यमातून नुतन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चालवली जाते. त्याचे चार सेंटर्स राज्यात असून याचे मुख्य कार्यालय कवठेमहांकाळ या ठिकाणी आहे. आजच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्या संस्थेच्या नर्सिंग स्टाफच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना अल्पदरात उपचार कसे देता येतील, या उद्देशाने कोविड हेल्थ व केअर सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे. मुळात होमियोपॅथिक महाविद्यालय असल्याने या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे याचा फायदा ग्रामीण भागातल्या गरजू रुग्णांना व्हावा. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नूतन होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून कोरोना सेंटर सुरू करण्यात आला आहे.

शासकीय दरापेक्षा निम्मा दर

नुतन होमियोपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक मोहन माळी म्हणाले, कवठेमहांकाळ व आसपासचा परिसर हा दुष्काळी भाग आहे. मोठ्या संख्येने याठिकाणी गोरगरीब लोक आहेत. अशात कोरोना झाल्यानंतर त्यांना उपचाराचा खर्च परवडत नसल्याने ते रुग्णालयापर्यंत पोहोचत नाही. ही बाब ओळखून शासकीय दर हा आठ हजाराच्या आसपास आहे. पण, त्यामध्येही 50 टक्के सवलत देऊन याठिकाणी उपचार सेवा सुरू देण्यात येणार आहे. महाविद्यालयाची स्वतःची सर्व यंत्रणा या ठिकाणी सुसज्ज आहे. त्यामुळे रुग्णांची अत्यंत संवेदनशीलपणे काळजी घेतली जाणार आहे. रुग्णांना बरे करणे त्याचबरोबर त्यांना आर्थिक हातभार लावणे, हा या सेंटर सुरू करण्या मागचा उद्देश असल्याचे माळी यांनी सांगितले.

मुंबईच्या धर्तीवर उपचार

नुतन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे उपाध्यक्ष डॉ. ऋतुराज माळी म्हणाले, आपण गेल्या वर्षी कोरोनाच्या स्थितीत मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात काम केला आहे. त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली आहे. त्यामुळे आपल्या संस्थेच्या माध्यमातून हे सेंटर सुरू होत असताना ग्रामीण भागातल्या रुग्णांची सेवा करण्याच्या उद्देशाने व त्यांना चांगले उपचार देणे, हे ध्येय ठेवून आपण आपल्या सहकारी मित्रांच्या समवेत याठिकाणी उपचार करण्यासाठी दाखल झालो आहोत. तसेच मुंबई महापालिकेच्या धर्तीवर या ठिकाणी फिवर ओपीडी सुरू करण्यात आलेली आहे. ज्यामुळे प्राथमिक स्तरावर रुग्णांची स्थिती आणि त्यांना योग्य ते काळजी घेण्याचे सूचना देण्यात येणार असल्याने त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे.

हेही वाचा - सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट २२ टक्के.. पालकमंत्र्यांकडून लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत

Last Updated : May 24, 2021, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.