ETV Bharat / state

इस्लामपूर : मासे विक्रेत्याच्या खुनाचा अखेर उलगडा

author img

By

Published : Oct 30, 2020, 10:00 PM IST

गुरुवारी रात्री साडे आठ वाजता उरूणवाडी रस्त्यावर अक्षय भोसलेचा चाकू व धारदार कोयत्याने पाठलाग करत २९ वार करून खून केला होता. आर्थिक देव-घेवीतून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज होता.

police
पोलीस

सांगली - भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तुजारपूर येथील अर्जुन प्रल्हाद बाबर याने भाच्याच्या मदतीने अक्षय उर्फ तुकाराम अशोक भोसलेचा निर्घृणपणे खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. खून प्रकरणी मृत अक्षयचा मित्र मदन संभाजी कदम ( वय ३५ रा वाळवा) याला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य संशयित अर्जुन बाबरसह त्याचा भाचा सुरज संपत गायकवाड (रा.करंजवडे ता. वाळवा) व अन्य एकजण फरार आहे.

गुरुवारी रात्री साडे आठ वाजता उरूणवाडी रस्त्यावर अक्षय भोसलेचा चाकू व धारदार कोयत्याने पाठलाग करत २९ वार करून खून केला होता. आर्थिक देव-घेवीतून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. पण या प्रकरणी अक्षयचा मित्र मदन कदम याला अटक केल्यानंतर खुनाचे नेमके कारण पुढे आले आहे. ठाणे येथे आर्थिक देवाण-घेवाणीतून शिवाजी प्रल्हाद बाबर ( तुजारपूर ) यांचा २०१५ ला खून झाला होता. या खून प्रकरणात मृत अक्षय मुख्य संशयित होता. न्यायालयाने त्याची २०१८ मध्ये निर्दोष मुक्तता केली होती. त्यांनतर अक्षय हा मुंबईत रिक्षा चालवत होता. येथेच मदन कदम याची मैत्री झाली होती. गावाकडे आल्यावर दोन वर्षात अक्षय व मदनचा संपर्क होता. अक्षय गुन्हेगारीपासून बाजूला गेला होता. तर मदन गुन्हेगारीत होता. त्याच्यावर विनयभंग, मारामारी, जबरी चोरीसह पीठाअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

गेल्या दोन दिवसापासून तो अक्षय याच्याकडे मासे खरेदीसाठी येत होता. उधार मासे दे यावरून दोघांच्यात गुरुवारी वादावादीचा प्रकार घडला होता. यामुळे गुरुवारी रात्री पोलीस तपासाच्या केंद्रस्थानी मदन कदम होता. मासे उधारीवरून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. पण मदन कदमला अटक करून पोलिसी खाक्या दाखवल्यावर खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले.

दरम्यान, मदन कदम हा तुजारपूर येथील अर्जुन प्रल्हाद बाबर याच्या संपर्कात होता. आपल्या भावाचा खून करून अक्षय भोसले हा गावाकडे येवून राहत आहे. त्याने मार्च महिन्यात लग्न करून संसार थाटला होता. तसेच इस्लामपूर येथील मटण मार्केटमध्ये दसऱ्यापासून मासे विक्रीचा व्यवसाय त्याने सुरू केला आहे. मासे उधार न दिल्याचा राग डोक्यात ठेवत मदन याने अक्षय याच्या विरोधात बाबर याना चिथावत होता. यामुळे अर्जुन बाबर अस्वस्थ होत होता. गेल्या दोन दिवसांत हार्डवेअरच्या दुकानातून बाबर याने अक्षय याचा काटा काढण्यासाठी कोयता आणि चाकू खरेदी केला होता.

दोन दिवस पाळत ठेवून गुरुवारी रात्री अर्जुन बाबर याने भाचा गायकवाड, मित्र मदन कदम व एकाच्या मदतीने अक्षय याचा खून केला आणि फरार झाले. घटनास्थळी मिळालेल्या संशयितांच्या चप्पलवरून श्वान पथकाने आंबेडकर नाका येथील दारू दुकान दाखवले. येथे संशयित दारू पिल्याचे स्पष्ट झाले होते. अक्षय रोज किती वाजता घरी जातो. कोणत्या वाहनाने कोणत्या रस्त्याने जातो याची माहिती त्याचाच मित्र अक्षय याने खुनातील मुख्य संशयित अर्जुन बाबर याना देत असल्याचे फोन रेकॉर्डवरून पुढे आल्याचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले. या खून प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नारायण देशमुख करीत आहेत. पोलिसांनी फरारी संशयितांच्या अटकेसाठी स्वतंत्र पथके पाठवली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.