ETV Bharat / state

कोविड केंद्रांमध्ये सकारात्मक वातावरण ठेवा - उदय सामंत

author img

By

Published : Sep 10, 2020, 5:30 PM IST

कोरोना महामारीच्या स्थितीबाबत सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत उदय सामंत म्हणाले, रुग्ण वाढ होण्याच्या कारणांचा शोध घेवून त्यावर उपाय वेळेत करावेत. तसेच रुग्णांच्या तपासणीचे प्रमाण वाढवून निदान लवकर करावे.

बैठकीत पालकमंत्री व इतर
बैठकीत पालकमंत्री व इतर

रत्नागिरी- जिल्ह्यात बरे होणारे रुग्णांचे प्रमाण वाढवावे आणि मृत्यूदरावर नियंत्रण आणावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. त्यासाठी रुग्णांना उपचारप्रसंगी सकारात्मक वागणूक द्यावी, अशी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना केल्या आहेत. रुग्णालयातील वातावरणात आपण निश्चितपणे ठीक होणार आहोत, असा रुग्णामध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी त्यांनी विविध सूचनाा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोना महामारीच्या स्थितीबाबत सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत उदय सामंत म्हणाले, रुग्ण वाढ होण्याच्या कारणांचा शोध घेवून त्यावर उपाय वेळेत करावेत. तसेच रुग्णांच्या तपासणीचे प्रमाण वाढवून निदान लवकर करावे. जेणेकरुन उपचार गतिमान पध्दतीने होण्यास मदत होऊ शकते. त्यामधून कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात राहील, असेही सामंत यावेळी म्हणाले.

कोविड केअर सेंटरमध्ये प्रसन्न वातावरण ठेवणे आवश्यक आहे. रुग्णाला घरी असल्याप्रमाणे सुविधा देण्याची सुरुवात करा. यात रुग्णांच्या मनोरंजनासाठी टिव्हीची व्यवस्था करावी, अशी सूचनाही उदय सामंत यांनी केली. रुग्णांना गाणी ऐकण्यासाठी हेडफोनसारख्या सुविधा द्या. यामुळे रुग्णांची मानसिकता सकारात्मक राहील, असेही सामंत यावेळी म्हणाले.

रुग्णांच्या आकडेवारीचा योग्य ताळमेळ ठेवा

कोरोनाच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गृह विलगीकरणात अनेक रुग्ण आहेत. तर काही रुग्ण उपचारासाठी इतर जिल्ह्यात गेले आहेत. यापैकी किती रुग्ण बरे झाले याचा एकदा आढावा घ्या, अशी उदय सामंत यांनी सूचना केली. जेणेकरुन योग्य आकडेवारी समोर येईल. याबाबतची कारवाई तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ज्यांना कोरोना नाही, अशा रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोव्हीड रुग्णाच्या मृत्यूनंतरच्या पध्दतीने केले जातात. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. अशा रुग्णांच्या मृत्यूनंतर अँटीजेन चाचणी करुन कोव्हीडबाबत खात्री करावी. कोव्हीड नसल्यास नातेवाईकांना त्याची माहिती पारदर्शकपणे द्या, असे निर्देशही सामंत यांनी या बैठकीत दिले.

बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंंदुमती जाकर, अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर, डॉ. अनिल बोल्डे तसेच नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, सभापती बाबू म्हाप आदींसह इतर अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.