ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित मेडिकल कॉलेज दापोलीमध्ये व्हावे - योगेश कदम

author img

By

Published : Nov 24, 2020, 4:59 PM IST

Updated : Nov 24, 2020, 5:16 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या मेडिकल काॅलेजचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मेडिकल काॅलेज कुठे उभारावे यावरून सध्या शिवसेनेच्याच नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. मेडिकल कॉलेज हे दापोलीमध्ये व्हावे, अशी मागणी आता योगेश कदम यांनी केली आहे.

Demand for medical college in Dapoli
आमदार योगेश कदम

रत्नागिरी - जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या मेडिकल काॅलेजचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मेडिकल काॅलेज कुठे उभारावे यावरून सध्या शिवसेनेच्याच नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत हे मेडिकल कॉलेज होईल हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज हे दापोली मतदारसंघात व्हावे, अशी आग्रही मागणी खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार योगेश कदम यांनी केली आहे. यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

भौगोलिकदृष्ट्या दापोली हे कोकणातील मध्यवर्ती ठिकाण

याबाबत बोलताना आमदार योगेश कदम म्हणाले की, सिंधुदुर्गमध्ये आता मेडिकल कॉलेजचे काम सुरू होत आहे, रत्नागिरी जिल्ह्यात देखील मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी सगळेच आमदार प्रयत्न करत आहेत. प्रत्येक आमदाराला वाटते की मेडिकल कॉलेज हे आपल्या मतदार संघात व्हावे, त्यामध्ये काही गैर नाही. मात्र भौगोलिकदृष्ट्या बघता दापोली मतदारसंघ हा कोकणाचा मध्यवर्ती भाग आहे. अलिबागपासून सिंधुदुर्गपर्यंत आपण विचार केला तर रायगडचे मेडिकल कॉलेज हे अलिबागमध्ये होणार आहे. तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मेडिकल कॉलेज हे सिंधुदुर्गातच होणार आहे, त्यामुळे रत्नागिरीमध्ये होणारे कॉलेज हे दापोलीमध्ये व्हावे ती योग्य जागा आहे. तसेच दापोलीमध्ये शासनाच्या मालकीची 300 एकर जमीन आहे. त्यामुळे कॉलेजसाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न सुटेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

मेडिकल कॉलेज दापोलीत उभारण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांशी चर्चा

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा केली आहे. आदित्य ठाकरे यांच्याशीही चर्चा झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दापोली दौऱ्यावर असताना त्यांच्यासमोर देखील आपण हा विषय मांडला आहे. आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सहमतीने सोडवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच माझी मागणी योग्य असून विरोध होण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - जालन्यात भाजयुमोकडून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

हेही वाचा - दौंड येथे घरफोडी, 1 लाख 86 हजारांचा ऐवज लंपास

Last Updated : Nov 24, 2020, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.