ETV Bharat / state

रायगड : लाच घेताना जिल्हा परिषदेच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना रंगेहात अटक

author img

By

Published : Jan 29, 2021, 9:58 PM IST

दहा हजारांच्या लाचेप्रकरणी पनवेल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांना अलिबाग लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

education officer of zilla parishad caught red hand by anti corruption department in raigad
रायगड : जिल्हा परिषदेचे गटशिक्षणाधिकारी अडकले लाचलूचपतच्या जाळ्यात

रायगड - सेवापट आणि शेवटचे पगार पावती बदली झालेल्या ठिकाणी जोडण्यासाठी मागितलेल्या दहा हजारांच्या लाचेप्रकरणी पनवेल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांना अलिबाग लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. अलिबाग जिल्हा परिषद कार्यालयातून साबळे यांना लाचलुचपत पथकाने अटक केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदमधील शिक्षण विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

दहा हजारांची केली होती मागणी -

फिर्यादी शिक्षक यांची पनवेल येथून यवतमाळ येथे बदली झाली होती. यवतमाळ येथे बदली झालेल्या ठिकाणी जाऊन आपला पगार निघावा, यासाठी सेवापट आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे रुजू असतानाची शेवटची पगार पावती मिळावी, यासाठी फिर्यादी यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांच्याकडे मागणी केली होती. नवनाथ साबळे यांनी फिर्यादी याच्याकडे सेवापट आणि पगार पावतीसाठी आधी पन्नास हजारांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर दहा हजारांची तोड झाली.

जिल्हा परिषद कार्यालयातून केली अटक -

फिर्यादी यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी अलिबाग लाच लुचपत विभागाशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली. त्यानुसार लाच लुचपत पथकाने पनवेल येथे जाऊन आधी तपासणी केली. त्यावेळी साबळे हे अलिबाग जिल्हा परिषद येथे गेले असल्याचे कळले. त्यानुसार फिर्यादी हे अलिबाग जिल्हा परिषदमधील शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेले. याठिकाणी साबळे यांनी त्यांच्या कागदपत्रांवर सही करून दहा हजार रुपये लाच स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत पथकाने साबळे यांना रंगेहाथ पकडून अटक केली.

पुन्हा शिक्षण विभाग चर्चेत -

जिल्हा परिषदमधील शिक्षण विभाग हा नेहमीच चर्चेत असलेला विभाग आहे. बदली, अनुकंपा भरती यासारख्या विषयात नेहमी अर्थकारण होत असल्याचे समोर आले आहे. आता पुन्हा एकदा शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा - जिल्हा-तालुका पातळीवर अहिंसेच्या मार्गाने आंदोलन होणार - अण्णा हजारे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.