ETV Bharat / state

यावर्षी गणेशाला किनाऱ्यावरूनच द्यावा लागणार निरोप; अलिबाग प्रशासनाचा निर्णय

author img

By

Published : Aug 18, 2020, 3:15 PM IST

यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गणेशाच्या आगमनाबरोबर विसर्जनाचीही तयारी करण्यासाठी अलिबाग प्रशासनाने पावले उचलली आहेत. यावर्षी गणेशभक्तांना विसर्जनासाठी थेट समुद्रात जाता येणार नाही. किनाऱ्यावरूनच गणरायाला निरोप द्यावा लागणार आहे.

Sachin Shejal
तहसीलदार सचिन शेजाळ

रायगड - 22 ऑगस्टला गणरायाचे आगमन होणार आहे. मात्र, यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट आहे. गणेशाच्या आगमनाबरोबर विसर्जनाचीही तयारी करण्यासाठी अलिबाग प्रशासनाने पावले उचलली आहेत. यावर्षी गणेशभक्तांना विसर्जनासाठी थेट समुद्रात जाता येणार नाही. किनाऱ्यावरूनच गणरायाला निरोप द्यावा लागणार आहे. याबाबत अलिबाग तहसीलदार कार्यालय, पोलीस आणि नगरपालिकाप्रशासनाकडून तयारी केली जाणार आहे. गणेशभक्तांनी यावर्षी प्रशासनाला सहकार्य करून आरोग्यदायी आणि साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन तहसीलदार सचिन शेजाळ यांनी केले आहे.

यावर्षी गणेशभक्तांना गणेश विसर्जनासाठी समुद्रात जाता येणार नाही

यावर्षी घरगुती गणपती विसर्जनावेळी दोन तर सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी पाच व्यक्तींना प्रशासनाने परवानगी दिली आहे. अलिबाग पोस्ट ऑफिसच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावले जाणार असून तेथून स्कॅनिंग करूनच गणेशभक्तांना पुढे सोडले जाणार आहे. गणेशभक्तांनी घरीच आरतीकरून गणरायाला विसर्जनासाठी आणायचे आहे. क्रीडा भवन येथे चार काऊंटर लावले जाणार आहेत. त्याठिकाणी आलेल्या गणेश भक्तांकडून निर्माल्य गोळा केले जाणार आहे. त्यानंतर स्वयंसेवक गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करणार आहेत. तेच गणेश भक्तांना पाटावर रेती आणि कलशात पाणी आणून देणार आहेत. सेवेसाठी ठेवलेल्या या स्वयंसेवकांची अगोदरच प्रशासनाकडून कोविड तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.

सार्वजनिक मंडळांनी यावेळी गणेशोत्सव रद्द करावा अथवा दीड दिवसाचा ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. या आवाहनाला काही मंडळांनी प्रतिसाद देत गणेशोत्सव रद्द केला आहे. अलिबाग पोलिसांनी विसर्जनानिमित्त शहरात एकदिशा मार्गाचे नियोजन केले आहे. अलिबाग समुद्र किनारी गणेशमूर्ती विसर्जनावेळी जीवरक्षक, स्वयंसेवक, अलिबाग नगरपालिका कर्मचारी, पोलीस तैनात राहणार आहेत.

दरवर्षी गणेश विसर्जनावेळी समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यावर्षी कोरोना संकट असल्याने विसर्जनाबाबत प्रशासनाकडून काटेकोर पावले उचलली गेली आहेत. ग्रामपंचायतींनीही असेच नियोजन करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.