ETV Bharat / state

मित्रांसोबत शरीरसंबंधास नकार देणाऱ्या पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण, पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

author img

By

Published : Oct 23, 2020, 3:50 PM IST

पत्नीने मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने, तिला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाले आहेत.

pune crime news
पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण

पुणे - प्रेमविवाह करून घरात आणलेल्या पत्नीने दारुड्या मित्रांसोबत शय्यासोबत करावी, यासाठी तिला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 19 वर्षीय पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, पतीसह पाच जणांविरोधात लोणी काळभोरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच पतीसह त्याचे चार मित्र सूरज कांबळे, करण खडसे, तानाजी शिंदे आणि विशाल माने हे फरार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी पती यांचा दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पती दौंड येथील एका कंपनीत कामाला होता. कोरोना काळात नोकरी गेल्याने तो घरीच होता. या काळात त्याची इतर आरोपींशी ओळख झाली. आरोपीच्या घरात बसूनच ते दररोज दारू प्यायचे. काही दिवसांपूर्वी दारू प्यायल्यानंतर त्याने पत्नीला मित्रांसोबत शय्यासोबत करण्यास सांगितले. परंतु तिने त्याला नकार दिल्याने तिला बेदम मारहाण करण्यात आली.

सोमवारी पुन्हा हाच प्रकार घडला. त्यावेळीही पीडित महिलेने मित्रांसोबत शय्यासोबत करण्यास नकार दिल्याने, आरोपीने तिला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना जवळच राहणाऱ्या घरमालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करून तिला सोडवले. त्यानंतर पीडित महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.