ETV Bharat / state

नागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम महानगर विकसीत करताना आराखड्यांमध्ये सूचनांचा अंतर्भाव करावा - उपमुख्यमंत्री

author img

By

Published : Aug 29, 2021, 5:35 PM IST

पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यानुसार नागरिकांना राहण्यायोग्य असे सर्वोत्तम महानगर विकसीत करताना लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून येणाऱ्या सूचना निश्चितच उपयुक्त ठरतील. आराखड्याला अंतिम स्वरूप देताना या सूचनांचा अंतर्भाव करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि. 29 ऑगस्ट) येथे दिले.

न

पुणे - पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यानुसार नागरिकांना राहण्यायोग्य असे सर्वोत्तम महानगर विकसीत करताना लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून येणाऱ्या सूचना निश्चितच उपयुक्त ठरतील. आराखड्याला अंतिम स्वरूप देताना या सूचनांचा अंतर्भाव करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि. 29 ऑगस्ट) येथे दिले.

विधानभवन येथील सभागृहात पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार वंदना चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार संजय जगताप, आमदार दिलीप मोहिते, आमदार अशोक पवार, आमदार सुनील टिंगरे, आमदार भीमराव तापकीर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार चेतन तुपे, आमदार राहुल कुल, विभागीय आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

भविष्यातील सर्वच बाबींचा विचार आराखड्यात केला जावा

पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्याला अंतिम स्वरुप देताना लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून येणाऱ्या सूचना निश्चितच उपयुक्त ठरतील. त्यामुळे आराखड्याला अंतिम स्वरूप देताना या सूचनांचा विचार करावा. वाढते नागरिकरणाचा विचार करून भविष्यातील सर्वच बाबींचा विचार आराखड्यात केला जावा, अशा सूचना यावेळी पवार यांनी केल्या. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला बचतगट यांच्यासाठी सुविधा तसेच सायकल झोन निर्माण करण्याबाबत सूचना केली.

विकास आराखड्यात महत्वाचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले

या विकास आराखड्यात 2 रिंगरोड, हायस्पीड रेल्वे व क्रिसेंट रेल्वे, 10 मेट्रो मार्गिका, 13 मल्टी मॉडेल हब, 4 प्रादेशिक केंद्रे, 15 नागरी केंद्रे, 12 लॉजिस्टिक केंद्रे, 5 पर्यटन स्थळ व 3 सर्किट्स, 5 शैक्षणिक केंद्रे, 2 वैद्यकीय संशोधन केंद्रे व 7 अपघात उपचार केंद्रे, जैव विविधता उद्यान, कृषी प्रक्रिया संशोधन व विकास केंद्रे, 1 क्रीडा विद्यापीठ, 8 ग्रामीण सबलीकरण केंद्रे, 59 सार्वजनिक गृह प्रकल्प, 26 नगर रचना योजना, 4 कृषी उत्पन्न बाजार केंद्रे, 5 प्रादेशिक उद्याने, 8 जैव विविधता उद्याने व 16 नागरी उद्याने, 4 अक्षय उर्जा निर्मिती केंद्रे, 30 अग्निशमन केंद्रे, असे महत्त्वाचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र 6 हजार 914.26 चौरस किलोमिटरचे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र 6 हजार 914.26 चौरस किलोमिटरचे असून हे क्षेत्र राज्यातील सर्वात मोठे आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र आहे, असे पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. दिवसे यांनी विकास आराखड्याचे सादरीकरण करताना सांगितले. पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यात आलेली असून त्यामध्ये प्राधिकरण हद्दीतील 23 गावांचा समावेश करण्यात आला असून त्यांची प्रारुप विकास योजना तयार करणेकरीता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची “विशेष नियोजन प्राधिकरण” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हवाई सर्व्हेक्षण, प्रत्यक्ष स्थळ निरिक्षण व भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस)चे आधारे संपूर्ण नियोजन क्षेत्राचा विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करण्यात आलेला आहे व त्यामध्ये डिजीटल एलेव्हेशन मॉडेलचा वापर करण्यात आला आहे. तसेच सर्व्हे नंबरसह गाव नकाशे जीआयएस प्रणालीवर दर्शवून बेस मॅप तयार करण्यात आलेला आहे.

नियोजित क्षेत्रासाठी 18 नागरी विकास केंद्रे प्रस्तावित

नियोजित क्षेत्रातील प्रस्तावित नागरीकरणाखालील क्षेत्र 1 हजार 638.21 चौ.कि.मी. आहे. त्यामध्ये 18 नागरी विकास केंद्रे प्रस्तावित केली असून त्यामध्ये सन 2011 नुसार लोकसंख्या 9.53 लाख आहे व सन 2041 ची संभाव्य लोकसंख्या 40.74 लाख इतकी आहे. सर्व 18 नागरी विकास केंद्रासाठी रहिवास, वाणिज्य, औद्योगिक, लॉजिस्टीक, वनीकरण, शेती हे वापर विभाग प्रस्तावित करण्यात आले आहेत. ही विकास केंद्रे लगतच्या ग्रामीण भागातील 5 कि.मी. परिसर क्षेत्रास सोयी-सुविधा पुरवतील. प्रत्येक नागरी केंद्रासाठी उपलब्ध साधनसामुग्री, संसाधनांचा विचार करून आर्थिक वृद्धीसाठी विशिष्ट संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार नियोजन आराखड्यात पूरक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संपूर्ण महानगर प्रदेशाचा विकास आराखडा तयार करताना संयुक्त राष्ट्र संघाने निश्चित केलेल्या शाश्वत विकास उद्दीष्टांचा विचार केला आहे. त्या अनुषंगाने पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विकास प्रकल्पामध्ये नैसर्गिक स्त्रोतांचा सर्वोत्तम कार्यक्षम वापर व शाश्वत विकासासाठी आवश्यक उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

सूचना, हरकतींसाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

उर्वरित ग्रामीण क्षेत्रासाठी एकूण 8 ग्रामीण विकास केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत व त्याच्यासाठीही स्वतंत्र विकास योजना तयार करण्यात आले आहेत. उर्वरित ग्रामीण क्षेत्रामध्ये शेती, वन, वनीकरण, हिल टॉप, हिल स्लोप, पर्यटन, ग्रीन बेल्ट वापर विभाग व रस्त्यांचे जाळे (नेटवर्क) प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रारुप विकास योजनेसाठी नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येत आहेत. प्रारूप योजना प्रसिद्ध करण्याबाबतची नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीसाठी प्रारूप विकास योजना नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यासाठी प्राधिकरणाच्या औंध येथील कार्यालयात नागरिकांना समक्ष पाहण्यासाठी कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच 9 तहसील कार्यालयात नकाशे ठेवण्यात आले आहेत. प्रारूप विकास योजना प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरही पाहण्यासाठी उपलब्ध असेल. नागरिकांनी आपल्या हरकती, सूचना समक्ष किंवा टपालाव्दारे अथवा ईमेलव्दारे दाखल करू शकतात, शासनाने दिनांक 15 सप्टेंबर, 2021 पर्यंत सूचना किंवा हरकती सादर करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे.

हेही वाचा - अफगाण विद्यार्थ्यांबरोबर राज्य सरकार खंबीरपणे उभे - मंत्री उदय सामंत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.