ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत गरजूंसाठी शिवभोजन थाळीची सोय

author img

By

Published : Mar 31, 2020, 11:07 PM IST

सध्याच्या परिस्थितीत रोजंदारी आणि हातावर पोट असणाऱ्यांसाठी अन्न-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा विचार करता, बारामतीतही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे.

बारामती
बारामती

बारामती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान रोजंदारी व हातावर पोट असणाऱ्या कुटुंबीयांच्या अन्न-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा विचार करता, बारामतीत शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. यामुळे शहरातील शेकडो कुटुंबीयांना अल्पदरात भोजन मिळत असल्याने गरजू नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून गरजूसांठी सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी, पुण्यापाठोपाठ आता बारामतीत ही सुरू करण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार ठप्प असल्याने रोजंदारीवर उपजीविका करणाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती. अशा गरजू कुटुंबीयांसाठी बारामतीतील रयत भवन येथे केवळ पाच रुपयात १२ ते ३ यावेळेत शिवभोजन थाळीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी गरजूंनी ओळख म्हणून आधारकार्ड किंवा मतदान कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे.

आजपासून सुरू झालेल्या या उपक्रमातून शंभराहून अधिक गरजूंनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. गरजूंसाठी मिळणाऱ्या अवघ्या पाच रुपयाच्या थाळीत दोन चपात्या, एक भाजी, वरण भात देण्याची सोय करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापकांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. गरजूंसाठी भोजन व्यवस्था करत असताना, दोन नागरिकांमधील सुरक्षित अतंर ठेवण्याबरोबरच इतर अनुषंगिक बाबींची योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.

गरजूंकडून सरकारचे आभार -

सध्याच्या परिस्थितीत रोजंदारी आणि हातावरील पोट असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. अशा वेळी सरकारकडून अत्यअल्प दरात शिवभोजन थाळीचा उपक्रम राबवून पोटाचा प्रश्न सोडवल्यामुळे गोरगरीब नागरिकांकडून कृतज्ञता व्यक्त करत सरकारचे आभार मानले जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.