ETV Bharat / state

संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात; 9 डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर 11 डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा, जाणून घ्या कसा असेल कार्यक्रम !

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 11:23 AM IST

Updated : Dec 6, 2023, 2:43 PM IST

Sanjivan Samadhi Sohala 2023 : आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा सुरू झाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. 9 डिसेंबरला कार्तिकी एकादशी आहे, तर 11 डिसेंबरला संजीवन सोहळा पार पाडणार आहे.

Sanjivan Samadhi Sohala 2023
संग्रहित छायाचित्र

पुणे Sanjivan Samadhi Sohala 2023 : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जनक गुरुवर्य हैबतबाबा आरफळकर यांच्या पायरी पूजनानं या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं 5 ते 12 डिसेंबर या कालावधीत आळंदीत कार्तिकी वारी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात

राज्यभरातील वारकरी, भाविक आळंदीनगरीत दाखल होऊ लागले आहेत. 700 वर्षांपूर्वी विठ्ठलानं आपला लाडका भक्त ज्ञानेश्वर माऊलींना यापुढं दरवर्षी संजीवन समाधी सोहळ्याला आळंदीस येईल, असा शब्द दिला होता. आज देवाच्या पादुकांसह हजारो भाविकांनी आळंदीकडं प्रस्थान केलं आहे.

संजीवन सोहळ्याची जय्यत तयारी : कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी देवस्थान आणि आळंदी पालिका यांच्याकडून जय्यत तयारी सुरू आहे. भाविकांना पिण्याचं पाणी, आरोग्य तपासणी, मोबाईल टॉयलेट आदी सोयीसुविधादेखील देवस्थानतर्फे उपलब्ध करण्यात येत आहेत. कार्तिकी वद्य एकादशीला मध्यरात्रीपासून माउलींच्या संजीवन समाधीवर अकरा ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात पूजा, दुग्धाभिषेक होईल. त्यानंतर दुपारी माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्याच्या बाहेर पडेल. नगरप्रदक्षिणेनंतर पालखी सायंकाळी मंदिरात पुन्हा प्रवेश करेल. दरम्यान, भाविकांचं दर्शन दिवसभर सुरू राहणार आहे.

माऊलींच्या पालखीची होणार नगरप्रदक्षिणा : रविवारी मध्यरात्री प्रांताधिकार्‍यांच्या हस्ते माऊलींच्या समाधीवर पहाटे पूजा होईल. त्यानंतर दुपारी रथोत्सवासाठी माऊलींची पालखी मंदिरातून बाहेर पडेल. गोपाळपुरा इथं माऊलींची पालखी रथात ठेवून नगरप्रदक्षिणा केली जाणार आहे. सोमवारी माऊलींचा मुख्य समाधीदिन सोहळा असून मध्यरात्री प्रमुख विश्वस्तांच्या हस्ते पवमान अभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या कालावधीत वीणामंडपात संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांचं माऊलींच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन होईल. दुपारी 12 वाजता घंटानाद, पुष्पवृष्टी आणि आरती झाल्यानंतर माऊलींचा समाधी दिनाचा कार्यक्रम पूर्ण होईल. त्यानंतर आरफळकरांच्या वतीनं जागर होईल. शेवटी अमावास्येला मंगळवारी समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगता फटाक्यांची आतषबाजी आणि पालखी छबिना मिरवणुकीनं होईल.

यात्रेसाठी PMPML ची ज्यादा बससेवा : आळंदी इथल्या यात्रेसाठी जादा बससेवा सोडण्यात येणार आहे. बुधवारपासून ते 12 डिसेंबर 2023 यादरम्यान 342 जादा बस सोडण्यात देण्यात येणार आहेत. तसेच 8 डिसेंबर 2023 ते 11 डिसेंबर 2023 या चार दिवसासाठी रात्रीही बससेवा देण्यात येणार असल्याची माहिती महामंडळानं दिली आहे. यात्रेनिमित्तानं आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरीत करुन काटेवस्ती इथून बसचं संचलन करण्यात येत आहे.

टाळ, पखवाजाची दुकाने सजली : कार्तिकी यात्रेसाठी आलेले भाविक हे बहुतांश वारकरी संप्रदायातील असतात. राज्यातील गावागावात कीर्तन, भजन, हरिपाठ असं वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम सातत्यानं होत असतात. या कार्यक्रमांसाठी टाळ, पखवाज, वीणा, हार्मोनियम हे साहित्य गरजेचं असते. या साहित्यांची आळंदीतील प्रदक्षिणा रस्त्यावर दुकानं असून ती आता सजली आहेत. यात्रेला आलेले भाविक आळंदीतून हे भजनी साहित्य खरेदी करत असतात. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रेदरम्यान कोट्यवधी रुपयांची या साहित्यांची उलाढाल होते.

इंद्रायणी घाटावर वाढतेय गर्दी : यात्रेला आलेले भाविक हे आपल्या नियोजित ठिकाणी एखाद्या धर्मशाळेत, मठात, वारकरी आश्रमात ठराविक मुक्कामासाठी असतात. तर ज्यांची कुठे सोय नाही, असे अनेक भाविक घाटावर आपला ठिय्या मांडतात. इंद्रायणी घाटावर आता हळूहळू गर्दी वाढत असल्याचं दिसत आहे. दुसरीकडं प्रदूषित इंद्रायणी ही तीर्थ म्हणून प्राशन करणारे वारकरी आणि या इंद्रायणीत स्नान केल्यामुळं त्यांना अनेक रोगराईंना सामोरं जावं लागू शकते.

हेही वाचा :

  1. Sanjivan Samadhi Ceremony : माऊलींचा 726वा संजीवन समाधी सोहळा; भाविकांची अलोट गर्दी
  2. Sanjivan Samadhi Ceremony माऊलींच्या जयघोषात संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी
  3. तीर्थेक्षेत्र आळंदीतील कार्तिकी वारीला आजपासून सुरवात; आळंदी बंदला संमिश्र प्रतिसाद
Last Updated : Dec 6, 2023, 2:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.