ETV Bharat / state

राम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठापना सोहळा : पुण्यातील गौरव देशपांडे यांच्या मुहूर्तानुसार होणार राम लल्लांची प्राण प्रतिष्ठापना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 1:14 PM IST

Ram Mandir Inauguration : राम मंदिराच्या उद्घाटनावरुन सध्या देशभरातील राजकारण चांगलच तापलं आहे. मात्र दुसरीकडं भाविकांना रामलल्ला मंदिरात विराजमान होत असल्याचा उत्साह आहे. राम मंदिर उद्घाटनाचा मुहूर्त पुण्यातील गुरुजींनी काढला असून त्यांनी काढलेल्या मुहूर्तानुसार राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे.

Ram Mandir Inauguration
संग्रहित छायाचित्र

पुणे Ram Mandir Inauguration : देशभरामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा 22 जानेवारीला होत आहे. देशभरामध्ये याचा मोठा उत्साह सुरू आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या श्रीराम मंदिरात पुणेकरांचं मोठं योगदान आहे. श्रीराम मंदिर उभारण्यात एकीकडं पुण्यातील अभियंत्यांचं योगदान असतानाच, आता याची प्राण प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्तसुद्धा पुण्यातीलच गुरुजीकडून करुन घेण्यात आला आहे. पुण्यातील देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी हा मुहूर्त काढला आहे. त्यामुळं आयुष्यभराचं भाग्य लाभल्याच्या भावना गौरव देशपांडे यांनी बोलून दाखवल्या आहेत.

गौरव देशपांडेंनी काढला मुहूर्त : एप्रिल 2023 मध्ये राम जन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांनी गौरव देशपांडे यांना त्यांच्या आश्रमात बोलवलं होतं. राम मंदिर प्रतिष्ठापनेचा अतिशय शुद्ध असा मुहूर्त आम्हाला हवा आहे, असं त्यांनी बजावलं. 25 जानेवारीच्या आतला आणि उत्तरायणा मधला तो हवा होता, अशी भूमिका गोविंद गिरी महाराज यांनी गौरव देशपांडे यांच्यापुढे मांडली होती.

प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी पौष महिना उत्तम : यावेळी बोलताना गौरव देशपांडे म्हणाले, "राम प्रभूंची प्रतिष्ठापना होताना पौष महिना आहे. पौष महिन्याबद्दल अनेक प्रकारचे समज गैरसमज लोकांमध्ये असतात. पौष महिन्यात शुभकामं करू नयेत, असं म्हटलं जातं. त्या दृष्टीनं प्राचीन ग्रंथ हस्तलिखित फॉरमॅटमध्ये आहे, त्यांची छाननी सुरू झाली. त्यामध्ये बृहद् दैवत नरंजन विद्या माधवीय मुहूर्त गणपती इत्यादी ग्रंथांचं परिशिलन केल्यानंतर, प्राण प्रतिष्ठेसाठी पौष महिना हा अतिशय उत्तम सांगितला आहे. त्याचं फळ देताना आचार्य असं सांगतात की पौष महिन्यात प्राण प्रतिष्ठा केली तर राज्याची वृद्धी होते, लोकांना लाभ होतो. जनता सुखी होते, असं फलित दिलं, तेवढं पाहून पौष महिना फिक्स करण्यात आला."

पौष महिना निश्चित केल्यानंतर तिथीचा प्रश्न : पुढं बोलताना देशपांडे म्हणाले की "पौष महिना निश्चित केल्यानंतर तिथीचा प्रश्न होता. कुठल्या तिथीला प्राण प्रतिष्ठापना करायची, कारण आपले सण वार सगळी संस्कृती ही तिथीवर अवलंबून आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे, की ज्या देवतेची तिथी असते, त्या देवतेचा वास त्या तिथीमध्ये असतो. प्रभू रामचंद्र हे विष्णूचे स्वरूप असल्यानं विष्णूची तिथी आहे. त्यामुळं द्वादशीची तिथी निश्चित करण्यात आली. त्या दिवशी येतो सोमवार, त्याचबरोबर वारांची सुद्धा अनुकूलता लागते."

मुहूर्त काढताना लागते अनेक गोष्टीची अनुकूलता : मुहूर्त काढताना अनेक गोष्टीची अनुकूलता लागते, वारांची अनुकूलता लागली तर त्यात तिथीची अनुकूलता लागते. सोमवारी प्राण प्रतिष्ठापना केली, तर ते सर्व जनतेला राजाला लाभप्रद होते, असं शास्त्रात लिहिलं आहे. सोमवार हा त्यासाठी अनुकूल मिळाला, त्यानंतर नक्षत्र कुठलं घ्यावं, तर त्या दिवशी मृग नक्षत्र आहे.

प्राण प्रतिष्ठापणेसाठी मृग नक्षत्र अतिशय उत्तम : मृग नक्षत्र हे अतिशय उत्तम आहे. प्राण प्रतिष्ठापनेसाठी त्यामुळं द्वादशी सोमवार मृग नक्षत्र या सर्वांचा मिळून दिवस आला तो 22 जानेवारी 2024. यातील वेळ सुद्धा महत्त्वाची होती. प्राण प्रतिष्ठापना होणार अयोध्याला, त्यामुळे आयोध्यातील रेखांश आणि अक्षांश याचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार मेष लग्नाचा सव्वा दोन तासाचा वेळ काढून देण्यात आलेला आहे. मूर्तीची स्थिर प्रतिष्ठापणा होणार असून पुढं हजारो वर्ष राहणार आहे. त्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांचा स्थिर मुहूर्त काढून दिला असल्याची माहिती गौरव देशपांडे यांनी दिलेली आहे. देशपांडे हे व्यवसायानं आयटी अभियंता आहेत. परंतु ते इतर वेळी याचा अभ्यास करतात. त्यांचं देशपांडे पंचांग हे प्रकाशन सुद्धा दरवर्षी होत असतं आणि गेले कित्येक वर्ष ते या सगळ्या वेद शास्त्रीय अभ्यासात कार्यरत आहेत.

हेही वाचा :

  1. अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही होणार वापर; कशी असेल सुरक्षा व्यवस्था
  2. अयोध्येत पापी लोकांना बोलावलं नाही; नितेश राणे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
  3. राम मंदिराच्या उद्घाटन दिनी सार्वजनिक सुट्टी हवी, संतांची केंद्र सरकारकडे मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.