ETV Bharat / state

Ganesh Birth Ceremony :  मंगल स्वरांच्या नादघोषात बाप्पाचा जन्म सोहळा उत्साहात

author img

By

Published : Jan 25, 2023, 8:26 PM IST

श्रीगणेशा पाळणा 'हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमधी.....' अशा मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशातील महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. स्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्रीगणेशजन्म सोहळा पार पडला.

Dagdusheth Ganapati Trust Organized Event Ganesh Birth Ceremony Concluded with Chanting of Auspicious Tones
मंगल स्वरांच्या नादघोषात गणेशजन्म सोहळा संपन्न; दगडूशेठ गणपती ट्रस्ट कार्यक्रमाला अलोट गर्दी

दगडूशेठ गणपती ट्रस्ट आयोजित गणेशजन्म सोहळा उत्साहात संपन्न; मंगल स्वरांच्या नादघोषात बाप्पाचा जन्म

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने गणेशजन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला डॉ. कृतार्थ क्षीरसागर, डॉ. रिद्धी क्षीरसागर, केदार गोडसे, प्राजक्ता गोडसे यांच्या हस्ते गणेशजन्माचे पूजन झाले. मंदिरावर केलेली तिरंगी फुलांची आरास व विद्युतरोषणाई अशा मनोहारी सजावटीने मंदिर परिसर अधिकच खुलला. शेकडो गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत सुख-समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना सर्वांनी श्रीचरणी केली. आज दुपारी १२ वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Ganesh Birth Ceremony Concluded with Chanting of Auspicious Tones Event Organized by Dagdusheth Ganapati Trust was Crowded
मंगल स्वरांच्या नादघोषात गणेशजन्म सोहळा संपन्न; दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आयोजित कार्यक्रमाला अलोट गर्दी

जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी : यावेळी शारदा गोडसे, मृणालिनी रासने, ज्योती सूर्यवंशी, तृप्ती चव्हाण, संगीता रासने, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्चना भालेराव, डॉ. अनघा राजवाडे, प्रेरणा देशपांडे, चित्रा जोशी, रत्ना नामजोशी, मानसी गिजरे यांसह इतर महिलांनी जन्माचा पाळणा, गणेश गीत व गणपतीचा गजर केला. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.

भक्तांच्या देणगीतून सुवर्णपाळणा : भक्तांनी दिलेल्या देणगीतून सुवर्णपाळणा साकारण्यात आला. सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोर ग, मधोमध विसावला,माझा गणराज ग...असे म्हणत यंदाचा जन्मोत्सव सुवर्णपाळण्यात झाला. पाळण्याकरिता पाच फूट उंचीचा सागवानी लाकडाचा स्टॅड तयार करण्यात आला असून त्यावर ८.५ किलो चांदी वापरण्यात आली. तसेच त्यावर सोनाचे पॉलिश देखील करण्यात आले आहे. या स्टँडवर १६ बाय २४ इंचाचा सोन्याचा पाळणा साकारण्यात आला असून त्याकरिता २ किलो २८० ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे.

श्रीचरणी स्वराभिषेक : बुधवारी पहाटे ४ ते सकाळी ६ या वेळेत पद्मश्री उस्मान खान यांनी सतारवादनातून श्रीचरणी स्वराभिषेक अर्पण केला. त्यापूर्वी पहाटे ३ वाजता मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक पार पडला. सकाळी ७ वाजता गणेशयाग, दुपारी ३ वाजता सहस्त्रावर्तने झाली. सायंकाळी ६ वाजता श्रींची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये फुलांनी सजविलेला आकर्षक रथ, बंड आदी सहभागी झाले होते.

'या' मार्गाने निघाली मिरवणूक : दगडूशेठ गणपती मंदिरापासून लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर रामेश्वर चौक- टिळक पुतळा मंडई - कोतवाल चावडी - बेलबाग चौक- लक्ष्मी रस्ता मार्गे नगरकर तालीम चौक - नू.म.वि. प्रशाला अप्पा बळवंत चौक - तांबडी जोगेश्वरी मंदिर या मार्गाने गणपती मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला होता. गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह देशभरातून आलेल्या गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.